मंगळवारी देवेंद्र फडणवीसांनी भाजपाच्या कार्यकारणी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. राज्यात हजारो कोटींची लूट सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वाटेला काहीच येत नाही, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारबद्दलची नाराजी व्यक्त केली. तसंच सध्याचं हे सरकार म्हणजे कायद्याचं राज्य नसून काय ते द्या..फक्त घेण्याचं, वसुली करण्याचं राज्य चालवत आहे, असा आरोप केला.
तसेच देवेंद्र फडणवीसांनी आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट असल्याचे म्हटले. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत, असे फडणवीसांनी म्हटले होते. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहीतरी द्या असे महाराष्ट्रामध्ये जे राज्य होते ते दोन वर्षापूर्वी घालवण्यात आले आणि कायद्याचे राज्य आले. त्यामुळे त्यांची वेदना मी समजू शकतो असे संजय राऊत म्हणले.
पंतप्रधान मोदीसुद्धा गांधींच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहतात- संजय राऊत
“या राज्यातील प्रत्येक नागरिक मुख्यमंत्री आहे. जेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून ११ कोटी जनतेला मीच मुख्यमंत्री असल्याचे वाटत आहे आणि लोकशाहीत ही खूप मोठी गोष्ट आहे. या राज्याचा प्रत्येक व्यक्ती स्वतःला मुख्यमंत्री समजत असल्याचे फडणवीसांनी मान्य केले असेल तर मी त्यांच्या वक्तव्याचे स्वागत करतो. राज्यात मंत्र्यांनाही मंत्रीमंडळाचा महत्त्वाचा घटक असल्याचे वाटते. जसे मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला वाटतचं नाही की ते मंत्री आहेत. कोणत्याही खासदाराला वाटत नाही की मी खासदार आहे. पण महाराष्ट्रात संविधाच्या आधारावर आणि लोकशाहीच्या आधारावर हे सरकार चालत आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नसल्याचा आरोप केला. तसेच नवाब मलिकांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली. “देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहे. देवेंद्रजी, उघडा डोळे बघा नीट, स्वप्नं बघायचं बंद करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत तुम्ही नाही,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.