माझ्या नादाला लागू नका, मला आडवे आलात तर मी कोणालाही सोडत नाही. या दाढीने जर काही काडी फिरवली तर तुमची उरली-सुरली लंकासुद्धा जळून खाक होईल, असा जाहीर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. त्यांच्या या इशाऱ्यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
“दाढी खेचून आणली असती (असं उद्धव ठाकरे म्हणाले)… ही दाढी इतकी हलकी आहे का? या दाढीने जर काही काडी फिरवली तर तुमची उरली-सुरली लंकासुद्धा जळून खाक होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. मी कोणाला आडवा जात नाही. परंतु, मला कोणी आडवा आला तर मी त्याला सोडतही नाही. कारण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची मला शिकवण मिळाली आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.
हेही वाचा >> “या दाढीने काडी केली तर…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “माझ्या नादाला लागू नका, अन्यथा…”
संजय राऊत काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, लंका त्यांचीच आहे. लंका रावणाची जळते. रामाला दाढी नव्हती. रावणाला दाढी होती. त्यांना रामायण-महाभारत वाचायला लागेल. या महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री मिळाले होते. यशवंतराव चव्हाणांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री साहित्य, कला, काव्य यामध्ये रमायचे. त्यामुळे कोणाचं काय जळतंय हे लवकरच कळेल. मुळात दिल्लीचीच लंका जळतेय. तुम्ही ज्या लंकेत गेलेला आहात ती लंकाच आम्ही लोकसभा निवडणुकीत जाळणार आहोत.
या देशात हिंदुंचा पाकिस्तान होऊ देणार नाही
“या देशातील मुसलमान, ख्रिश्चन सर्व धर्मांना घाबवरलं जात आहे. हिंदू आणि अन्य धर्मांमध्ये वाद निर्माण केला जातोय. याचा देशाला धोका असून यामुळे देश तुटेल. पण महाराष्ट्रात मुस्लीम समाज आपल्याबरोबर आहे कारण, खूप मुसलमान नेता, कार्यकर्ता, गरीब-सामान्य मुसलमान आमच्याकडे येतात आणि सांगतात की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुमचं हिंदुत्त्व आमच्या घरात चूल पेटवण्याचं हिंदूत्त्व आहे. पण भाजपाचं हिंदुत्त्व आमचं घर जाळण्याचं हिंदूत्व आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे. देशात-घराघरात जात, धर्माच्या आधारावर नाही तर मानवतेच्या आधारावर रोजगार मिळाला पाहिजे हे आमचं हिंदुत्त्व आहे. रामाबरोबर कामही झालं पाहिजे. या देशात हिंदुंचा पाकिस्तान किंवा इराण होऊ देणार नाही. हा देश खूप मोठा आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.