भाजपा खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांवर गंभीर शब्दांत आरोप केले आहेत. संजय राऊतांचा डोळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असल्याचं राणे म्हणाले आहेत. यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलं. मात्र, त्यानंतर आता संजय राऊतांनी राणेंच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणेंनी संपूर्ण पत्रकार परिषदेत संजय राऊतांवरच टीका केली असताना संजय राऊतांनी त्यांना मोजक्या शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. ” ते आम्हाला अटक होईल म्हणतायत, आम्हाला अटक होऊ दे. विनायक राऊत यांनी शिवालयमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका योग्य पद्धतीने मांडली आहे. मला माहीत नाही कोण काय बोललंय ते. विनायक राऊतांनी जोरदार पद्धतीने प्रत्युत्तर दिलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
“२०१४मध्ये बरेच लोक बेरोजगार झाले असतील”
“मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्तच आहे. आमचा असलाच तर फक्त शिवसेनेच्या विस्तारावर डोळा आहे. २०२४ साली शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल आणि बरेचसे लोक तेव्हा बेरोजगार झालेले असतील”, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.
काय म्हणाले राणे?
“संजय राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, यांना हटवा, तुम्हालाच मुख्यमंत्री करतो. उद्धव ठाकरे जेव्हा सरकार स्थापनेबाबत पहिल्यांदा शरद पवारांना भेटायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते. संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे. मी आज ओळखतो का तुम्हाला?” असा आरोप नारायण राणेंनी केला आहे.