विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाविरोधात भाजपा व शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही औरंगजेबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपा व शिंदे गटाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली जात आहे. तसेच, राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनही केली जात आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही आज ट्वीटद्वारे टीका केली. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “आशिष शेलारांनी टीका केली म्हणजे काय झालं? आशिष शेलार शंकराचार्य आहेत का देशाचे? कोण आहेत ते, हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना अधिकार काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान नाही का? याचं उत्तर त्यांनी द्यावं.”
काय म्हणाले होते आशिष शेलार? –
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला “टकमक टोकाकडे” घेऊन जात आहेत! आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे.”
“उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन चाकी सरकार आल्यापासून नियोजनबध्द कट रचलाय? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलेय? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून “अण्णाजी पंत” यांनी लिहीलेय?”
हेही वाचा – “आधी शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात…” शिंदे-फडणवीसांना उद्देशून संजय राऊतांचं विधान!
“छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते- .अजित पवार, औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता – जितेंद्र आव्हाड, दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी का? ही एक “औरंगजेबी” चाल तर नाही ना?”