छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केली जाणारी वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न यासह विविध मुद्द्यांवरून काल महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा मोर्चा ‘नॅनो मोर्चा’ असल्याची टीका केली होती. दरम्यान, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत?
“देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नाही. हेच वक्तव्य शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदार आणि त्यांच्या नेत्याने केलं असतं तर समजू शकलो असतो. कारण त्यांची बुद्धी नॅनो आहे, हे आम्हाला माहिती आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे प्रगल्भ राजकारणी आहेत. त्यांनी विरोधी पक्षातही प्रदीर्घ काम केलं आहे, अशा देवेंद्र फडणवीसांना कालचा मोर्चा दिसला नसेल, तर दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचं औषध दिलेलं दिसते आहे, ही त्यांची गुंगी अद्यापही उतरलेली नाही”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.
हेही वाचा – “हा ७० वर्षांचा जुनाट रोग, ‘जैसे थे’ च्या छाताडावर…”; ‘सामना’मधून संजय राऊतांचे भाजपावर ताशेरे
“देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मोर्च्याचे स्वागत करायला हवे होते. तसेच त्यांनी या मोर्चाला सामोरे जायला हवे होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. कालचा मोर्चा हा सरकारविरोधी नव्हता, हा मोर्चा हा महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात होता. त्यांच्या विरोधात महाराष्ट्राची जनता काल एवटली होती. मात्र, तुम्ही ज्या भाषेत त्यांच्या विरोधात बोलत आहात, हे राज्यकर्ता असल्याचे लक्षण नाही”, असेही ते म्हणाले.
“कालच्या मोर्चा ज्यांना दिसला नाही, त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्रद्वेषाचा वडस आला आहे. महाराष्ट्राबाबत इतका पराकोटीचा द्वेष आम्ही गेल्या ७० वर्षात कधीही बघितला नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विरोधी पक्ष एवटला होता. मात्र, त्यावेळी सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष आतून या आंदोलनाचे समर्थन करत होता. हा मोर्चा नॅनो होता का? हे देशाने बघितले आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांना माझं एवढंच सांगणं आहे, की तुम्ही स्वत:ची अवहेलना करून घेऊ नका, तुमचं राजकीय भविष्य उज्वल आहे. तुमच्याकडे ती क्षमता आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राचा द्वेष केला, ते पाचोळ्यासारखे उडून गेले”, अशी टीकाही त्यांनी केली.