Sanjay Raut : खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, असं विधान काल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, प्रकाश आबंडेकरांच्या विधानाला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना, प्रकाश आंबेडकरांना जर असं वाटत असेल तर त्यांना कायद्याच्या आणि लोकभावनेचा अभ्यास करावा लागेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा – Sanjay Raut : “शेख हसीना यांनी लोकशाहीचा मुखवटा घालून…”; बांगलादेशमधील परिस्थितीबाबत संजय राऊतांचे विधान!

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“जर आम्ही असं म्हणालो की रामदास आठवले यांचा पक्ष खरा आंबेडकरवादी पक्ष आहे, तर प्रकाश आंबेडकर यांच्या मनाला किती यातना होतील? पण आम्हाला त्यांच्या विधानाने यातना होत नाहीत. आम्ही असं म्हणतो की प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. त्यांनी तो वारसा पुढे चालवावा”, असं संजय राऊत म्हणाले.

“प्रकाश आंबेडकरांना कायद्याचा अभ्यास करण्याची गरज”

पुढे बोलताना, “ ”जर प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल, की एकनाथ शिंदे यांचा पक्ष खरी शिवसेना आहे, तर त्यांना कायद्याचा आणि लोकभावनेचा अभ्यास करावा लागेल”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.

हेही वाचा – Raj Thackeray : “…तेव्हा काही गोष्टी कायमस्वरुपी त्यांच्या लक्षात राहतील”; ‘मॅच फिक्सिंगचं राजकारण करतात’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंचं प्रत्युत्तर!

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी काल माध्यमांशी बोलताना, “खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे”, असं विधान केलं होतं. “खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. शिवसेनेची पारंपरिक मतं एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतदारांनी एकनाथ शिंदेंवर विश्वास दाखवला. शिवसैनिक एकनाथ शिंदेंनाच खरे शिवसेनाप्रमुख मानू लागले आहेत. तसेच शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट वाढल्याचं आपण पाहत आहोत. मात्र आरक्षणवादी लोक आणि मुस्लिमांमुळे उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट वाढला आहे.” असे प्रकाश आबंडेकर म्हणाले होते.