गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले, असा हल्लाबोल अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केला. याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना फोडली, तरी ये डर अच्छा है, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
भाजपा तर्फे देशभरात ‘मोदी @ ९’ अभियान राबविले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली सभा शनिवारी नांदेड मध्ये पार पडली. तेव्हा बोलताना अमित शाह यांनी म्हटलं, “ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर निवडणूक लढवली होती, ते हिंदुत्व आता कुठं आहे. केवळ सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले.”
हेही वाचा : “शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, त्यात…”, एकनाथ खडसे यांचा मोठा दावा
“तीन तलाक, राम मंदिर, समान नागरी कायदा, मुस्लीम आरक्षण, वीर सावरकरांचा सन्मान करायचा की नाही, यावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी,” असं आव्हानही अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे. यावर संजय राऊत यांनी अमित शाह यांचं भाषण मजेशीर असल्याचं म्हणाले आहे.
ट्वीट करत संजय राऊतांनी म्हटलं की, “गृह मंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे. मला प्रश्न पडला आहे. हे भाजपाचे महा संपर्क अभियान होते की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याचे खास आयोजन.. अमित भाई यांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर… म्हणजे अजून ही मातोश्रीचा धसका कायम आहे.”
हेही वाचा : नव्या नियुक्तींमुळे अजित पवारांवर अन्याय झाल्याचं वाटतं? नारायण राणे म्हणाले, “शरद पवारांना…”
“शिवसेना फोडली, नाव आणि धनुष्यबाण गद्दार गटास लबाडी करून दिले. तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है. जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले, त्यावर खरे तर भाजपाने त्यावर चिंतन करायला हवे. पण, ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.