महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली होती. महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलयं? तुमच्यात दम असेल तर आधी दिल्ली विचारा, हे चालणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देत इशारा दिला होता.
“संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, आताच साडेतीन महिन्यांचा आराम करून बाहेर आला आहेत. बाहेरचं वातावरण तुम्हाला सुट होत नाही, असं तुमच्या बडबडण्यावरून वाटत आहे. त्यामुळे पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. अशी वक्तव्य संजय राऊतांनी टाळावा,” असं शंभूराज देसाई म्हणाले होते.
शंभूराज देसाईंच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ट्वीट करत संजय राऊतांनी म्हटलं की, “मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय?…महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ.”
“शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटकआव्हान देत आहे.यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा… कायदा… न्यायालये… तपासयंत्रणा खिशात आहेत असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का?मी तयार आहे.!!,” असेही संजय राऊतांनी सांगितलं.
हेही वाचा : ‘शिंदे सरकार नामर्द आहे’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “जेलमध्ये राहिल्याने…”
दरम्यान, राज्यातील शिंदे सरकार षंढ आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी केली होती. त्यावरून शंभूराज देसाई म्हणाले की, “सीमाप्रश्नी केंद्राशी समन्वय साधून महाराष्ट्राची बाजू भक्कम मांडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. असे असताना षंढ हा शब्द सरकारसाठी वापरला. संजय राऊतांना १५ दिवसांपूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यासाठी सुद्धा धाडस संजय राऊतांच्या नाही. मग, राऊत किती षंढ आहेत,” असा टोला देसाईंनी लगावला होता.