राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मुंबईत दाखल झाली आहे. आज या यात्रेचा शेवट होईल सायंकाळी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राहुल गांधी, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सभेने या यात्रेचा शेवट होईल. मुंबईत काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं. तर, दुसऱ्या बाजूला भाजपाकडून काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे. या टीकेला शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. तसेच राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले, धगधगत्या मणिपूरला नरेंद्र मोदी गेले नाहीत. ते केवळ अहमदाबादच्या व्यापाऱ्यांचा विचार करतात. त्यांना गुजरातव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. राहुल गांधी मणिपूरला जाऊ शकतात, तिथे राहू शकतात, तिथल्या पीडितांना भेटू शकतात. परंतु, मोदी हे करू शकत नाहीत. ते मणिपूरला जाऊ शकले नाहीत.
संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी राऊत यांना माध्यमांच्या एका प्रतिनिधीने प्रश्न विचारला की, भाजपा एका पुस्तकाचं प्रकाश करणार आहे. ‘कांग्रेस नसती तर काय झालं असतं?’ असं या पुस्तकाचं शीर्षक आहे. यावर संजय राऊत म्हणाले, काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं, आपल्या देशाला नेतृत्व मिळालं नसतं, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंतचे नेते आपल्याला मिळाले नसते. काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज भारत ज्या ठिकाणी आहे तितकी प्रगती झाली नसती. आपला देश अखंड राहिला नसता. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या भाजपाच्या अकलेच्या बाहेरच्या आहेत. कारण ते कधी देशाचा विचार करत नाहीत. ते केवळ उद्योगपतींचा आणि व्यापाऱ्यांचा विचार करतात.
हे ही वाचा >> ‘स्वाभिमानी’ मविआत सहभागी होणार? उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत राजू शेट्टींची भूमिका स्पष्ट; लोकसभेच्या जागांवरही बोलले
संजय राऊत म्हणाले, ज्यांचा राजा व्यापारी, त्यांची प्रजा भिकारी होते. भाजपा देशाला भिकारी करण्याचं काम करतेय. भाजपा काँग्रेसबद्दल बोलतेय, मात्र भाजपा नसती तर खूप काही चांगलं झालं असतं. देशात दंगली झाल्या नसत्या, आपला रुपया मजबूत झाला असता, देशाची प्रतीष्ठा वाढली असती. देशावरचं कर्ज कमी झालं असतं, जे लोक आपल्या देशाचे पैसे घेऊन पदेशात पळून गेले आहेत ते पळाले नसते. आपल्या देशात अनेक घोटाळे झाले नसते. निवडणूक रोख्यांचा घोटाळा, राफेल घोटाळा आणि इतर अनेक घोटाळे झाले नसते.