देशभरात करोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसह शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
“पंतप्रधानांचे भाषण ऐकताना माझ्याकडून काही चूक झाली का म्हणून मी ते वाचले. पंतप्रधानांनी महाराष्ट्रासंदर्भात केलेल्या उल्लेखावर महाराष्ट्र सरकारनेच याचा खुलासा करायला हवा. मला हे ऐकून वाईट वाटलं. या करोनाच्या महामारीचा उगम चीनमधून झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धारावी पॅटर्नचे कौतुक केले होते. महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे काम करते याचे दाखले हे सुप्रीम कोर्टाने इतर राज्यांना दिले. त्यामुळे हा महाराष्ट्राच्या जनतेचा, लोकनियुक्त सरकारचा, करोनाकाळात सातत्याने काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अपमान आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
“सॉरी सर, जीव धोक्यात घालून लोकांना…”; पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर काँग्रेस आमदाराचे प्रत्युत्तर
“महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी पुढे येऊन याच्यावर बोलायला हवे. चार राज्यांचा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रावर हा ठपका ठेवण्याचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे. त्यावेळी सोनू सूदला राजभवनात नेऊन राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते? सोनू सूद लोकं बाहेर पाठवत आहे म्हणून कौतुक कोण करत होते? आम्ही करत नव्हतो. उलट आम्ही घाई करु नका असे म्हणत होतो. त्यामुळे याप्रकरणी सविस्तर भूमिका राज्य सरकारनेच मांडायला हवी,” असेही संजय राऊत म्हणाले.
“यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया राज्य सरकारतर्फेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडायला हवी. मी माझ्या पुरतं माझं एक मत मांडलं. सरकारमध्ये जे बसलेले आहेत त्यांनी बोलायला हवं. प्रत्येक वेळेस मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही. ते काय करतायत? सरकार म्हणून त्यांची पण काही भूमिका आहे की नाही बोलण्याची, सांगण्याची. त्यांनी बोलावं ना! हा सरकारवर ठपका आहे,” असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, ‘‘करोनाच्या पहिल्या लाटेत देश टाळेबंदीचे पालन करत असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. त्यांनी लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्रावर असलेले परप्रांतीयांचे ओझे कमी होईल, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात, तिथे जाऊन करोना पसरवण्याचे काम करा, असा संदेश हे नेते देत होते. तुम्ही (काँग्रेस) लोकांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे पाप केले आहे. तुम्ही गोंधळाचे वातावरण निर्माण केले. तुमच्यामुळे कष्टकऱ्यांना असंख्य हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. तुम्ही देशभर करोना पसरवला’’, असा आरोप मोदींनी केला होता.