तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे पूत्र आणि तमिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी अलिकडेच एका भाषणादरम्यान सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती. त्यामुळे उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भाजपा आणि एनडीएतील पक्षांकडून टीकाही झाली. स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतला सदस्य आहे. स्टॅलिन यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून इंडिया आघाडीवरही टीका होत आहे. इंडिया आघाडीतल्या काही पक्षांनी उदयनिधींचा बचाव केला, तर काही पक्षांनी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे असं म्हणत हा यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. परंतु, इंडिया आघाडीतला हिंदुत्ववादी पक्ष शिवसेनेकडून (ठाकरे गट) यावर काही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेकांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.
दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत खासदार राऊत म्हणाले, प्रत्येकाला आपल्या धर्मावर बोलण्याचा अधिकार आहे. आम्हाला आमच्या धर्माबाबत बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही आमच्या धर्माचे संरक्षक आहोत. आमच्या धर्मावर स्वकियांनी हल्ला केला तरी तो आम्ही परतवून लावू शकतो. तेवढी ताकद आमच्यात आहे. आम्ही गांXX नाही. कोणीही आमच्या धर्मावर असा हल्ला केला तर आम्ही तो परतवून लावू.
उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले होते?
उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते की “सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. त्याचा विरोध करता येत नाही, त्यामुळे तो संपवायला हवा. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलंच पाहिजे. त्याचप्रमाणे, सनातन धर्मालाही संपवायचं आहे.”
हे ही वाचा >> ‘फसवणुकीचा अमृतकाल!’ मराठवाड्यातील कॅबिनेट बैठकीवरुन ठाकरे गटाची सरकारवर टीका
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि उदयनिधींचे वडील एम. के. स्टॅलिन काय म्हणाले?
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि उदयनिधी यांचे वडील एम. के. स्टॅलिन यांनी मुलाच्या वक्तव्यावर अलिकडेच प्रतिक्रिया दिली. स्टॅलिन म्हणाले, “उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मातील भेदभावावर मत व्यक्त केलं आहे. त्यांना कोणत्याही धर्माला अथवा श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नव्हता,”