मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर विरोधी पक्षाकडून टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज सकाळीच ट्वीटद्वारे शिवसेनेवर टीका केली आहे. तर, औरंगाबादमधील भाजपा नेत्यांकडून देखील विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेची पहिली शाखा ३७ वर्षांपूर्वी स्थापन झाली त्या पहिल्या शाखेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिना निमित्त संभाजीनगरला(औरंगाबाद) शिवसेनेची एक भव्य सभा आहे आणि त्या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहत आहेत. सभेची तयारी मागील काही दिवसांपासून जोरात सुरू आहे आणि संपूर्ण मराठवाड्यातून लाखो शिवसैनिक आजच्या सभेला येतील. कारण, बऱ्याच काळानंतर राज्याचे मुख्यमंत्री हे मुंबईच्या बाहेर जाऊन सभा घेत आहेत. त्याचं एक लोकांना आकर्षण आहे. देशात, राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यासंदर्भात शिवसेना पक्ष प्रमुखांचं त्यावर काय भाष्य असेल, या विषयी आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. आज संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री संभाजीनगरला पोहचतील आणि त्या भव्य सभेला संबोधित करतील.”
तर, विरोधकांकडून शिवसेनेवर केल्या जात असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी म्हटले की, “विरोधकांचं तोंड नसून गटार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावं, कसं बोलावं याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांविषयी तुमचा व्यक्तिगत द्वेष असू शकतो. त्यांनी जे काय मोठं काम करून ठेवलय, त्या विषयी. पण अशाप्रकारे तुमच्या तोंडातून जर भिजलेले फटाके फुटणार असतील, तर त्याची पर्वा आम्ही करत नाहीत.”
महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्ष उद्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबतच –
याशिवाय राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सांगितले की, “सरकार स्थापन करताना जे छोटे घटक पक्ष आमच्यासोबत होते, ते सगळे आजही आमच्याबरोबर आहेत. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी स्पष्ट केलंय, की एवढ्या मोठ्या सरकारमध्ये काही लहान-सहान गोष्टी असतात, जर कोणाच्या काही राहिल्या असतील तर त्या ताबडतोब करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्ष आजही उद्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबतच आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.”
१० तारखेला कळेलच कोण कोणाला मतदान करणार –
समाजवादी पार्टीच्या भूमिकाबद्दल संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “१० तारखेला कळेलच कोण कोणाला मतदान करणार आहे. समाजवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी आमची चर्चा झालेली आहे. शेवटी महाराष्ट्राचं सरकार हे किमान सामायिक कार्यक्रमावर चाललेलं आहे. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एक राज्याच्या विकासाचा आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसारच हे सरकार काम करत आहे.”
हितेंद्र ठाकूर हे आमच्या परिवारातील –
“हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सगळे सहकारी हे सगळे आमच्या परिवारातील आहेत. अत्यंत मनमोकळे असे ते नेते आहेत. जे काय आहे ते स्पष्ट आणि परखडपणे बोलणारे ते नेते आहेत. त्यांच्याशी आमचा संवाद सुरू आहे. हिंतेंद्र ठाकूर यांचा आग्रह नेहमी त्यांच्या भागातील विकास कामांविषयी असतो. त्यांचे आमदार ज्या भागाचं नेतृत्व करतात, त्या भागातील विकासकामांबाबत त्यांचा आग्रह असतो आणि तो आग्रह योग्य आहे.” असंही यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.
सुभाष देसाई, दिवाकर रावतेंचा पत्ताकट असं म्हणणं चुकीचं आहे –
विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन आहीर आणि आमशा पडवी ही दोन नावं निश्चित झाल्याचं समोर येत आहे. तर ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना मात्र शिवसेना यंदा विश्रांती देण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. यावरून माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की,“पत्ताकट हा शब्द चुकीचा आहे. सुभाष देसाई किंवा दिवाकर रावते हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांवी वर्षानुवर्षे पक्षाचं कार्य केलेलं आहे. अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्ये कर्तव्य बजावलेलं आहे. पक्ष वाढीसह अनेक गोष्टींसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी असं बोलणं योग्य नाही. पक्षाचे काही निर्णय असू शकतात, त्या निर्णयाच्या प्रवाहात हे दोन्ही प्रमुख नेते नेहमी सहभागी असतात. पक्ष त्यांना वेगळी जबाबदारी नक्कीच देईन, या दोन्ही नेत्यांचं कार्य खूप मोठं आहे.