गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे काँग्रेसकडून ममता बॅनर्जींच्या “देशात यूपीए आहे कुठे?” या प्रश्नावर जोरदार आक्षेप घेण्यात आला, तर दुसरीकडे भाजपाकडून ममता बॅनर्जींच्या प्रत्यक्ष दौऱ्यावरच आक्षेप घेण्यात आला. “मुंबईत येऊन ममता बॅनर्जी उद्योगपतींना भेटल्या, मुंबईतील उद्योग बंगालात पळवायचा त्यांचा डाव आहे”, अशी टीका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यावरून राजकारण तापलेलं असताना आता संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावरून भाजपाला खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, योगी आदित्यनाथ, गुजरातच्या मंत्रिमंडळाचा मुंबई दौरा याचीही आठवण त्यांनी भाजपाला करून दिली.
ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणाऱ्या भाजपाला संजय राऊत यांनी सामनामधील आपल्या रोखठोक या सदरातून प्रत्युत्तर दिलं आहे. “ममता बॅनर्जींनी जाताना सोबत काहीच नेले नाही हे उगाच ओरड करणाऱ्यांनी आणि मुंबईला ओरबाडणाऱ्यांना साथ देणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. भाजपा विरोधासाठी विरोध करतो, हे ममतांच्या दौऱ्यातही दिसलं. मुंबईत येऊन उद्योगपतींना भेटण्यात गैर काय?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
भाजपा मुख्यमंत्र्यांनी काय केलं?
दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्याची देखील आठवण करून दिली. “ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणारे भाजपा नेतृत्व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मुंबईतील हालचालींवर आक्षेप घ्यायला तयार नाही. ममतांच्या पाठोपाठ गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल त्यांचं अर्धं मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईतल्या उद्योगपतींना गुजरातचं निमंत्रण देण्यासाठी ते आले. आत्मनिर्भर गुजरात उभारण्यासाठी त्यांना मुंबईतील उद्योगपतींची मदत हवी. खुंटा बळकट करण्यासाठीच मुख्यमंत्री पटेल इथे अवतरले असंच भाजपाचं मत असायला हवं”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
यूपीए मान्य नसणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावं, पडद्यामागून गुटरगूं करू नये – शिवसेना
“त्यावर भाजपाने आक्षेप घेतला नाही”
“पटेल यांनी मुंबईत येऊन उद्योगपतींना साकडे घालायला काहीच हरकत नाही, पण भाजपाने ममतांवर नाहक टीका केली. म्हणून पटेलांचा विषय समोर आणला. योगी आदित्यनाथ तर मुंबईतील सिनेउद्योग लखनौला नेण्यासाठीच आले. त्यावरही भाजपाने आक्षेप घेतला नाही. मंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र एका रात्रीत अहमदाबादला खेचून नेले. त्या लुटमारीवरही भाजपाने भाष्य केले नाही. पण ममता बॅनर्जी प्रकरणात भाजपाची भूमिका टोकाची आहे. ममता बॅनर्जी आल्या आणि महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या”, असं राऊत यांनी या लेखात म्हटलं आहे.