अर्बन नक्षलवाद हा देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द आहे. अर्बन नक्षलवाद भाजपाच्या लोकांकडेच आहे. कारण ते रस्त्यावर खून करतात आणि तो पचवला जातो. बीडमधल्या अर्बन नक्षलवादाला देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन आहे का? हे त्यांनी सांगायला पाहिजे. तुम्ही आमच्याकडे एक बोट दाखवता तेव्हा चार बोटं तुमच्याकडे आहेत हे विसरु नका असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बीड आणि परभणीच्या प्रकरणांवरुन संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?

बीडमधल्या हत्याकांडाचे सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना त्याची लाज वाटली पाहिजे. एक नाही दोन मंत्री त्याच भागातले आहेत. त्यांनी ही हत्याकांडं घडवलेली आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांची नावं घ्यायला तुम्हाला लाज वाटते का? असा महाराष्ट्र घडवा असं या महापुरुषांनी सांगितल्याचं माझ्या स्मरणात नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी खोटं बोलणं थांबवलं पाहिजे-राऊत

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खोटं बोलणं थांबवलं पाहिजे. विरोधकांचा काटा काढण्यासाठी तुमच्याकडे गृहमंत्रिपद नाही. तसंच सहकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर पांघरुण घालण्यासाठी हे पद मिळालेलं नाही. लाडक्या बहिणींचे देवाभाऊ आहात ना? मग परळी आणि आसपासच्या परिसरातल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे लाडक्या देवाभाऊंनी लाडक्या बहिणी ज्या विधवा झाल्या आहेत तर कायद्याने या सगळ्याचा बदला घेतला पाहिजे. असं राऊत म्हणाले.

३८ पेक्षा जास्त लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं आहे

३८ पेक्षा जास्त लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांना माहीत नाही का? बाकी त्यांना सगळं माहीत असतं. आमचे फोन ते टॅप करतात. विरोधकांची माहिती घेतात, पक्ष फोडतात. वेशांतर करुन पक्ष फोडतात. वेशांतर करुन त्यांनी बीड आणि परभणीत फिरलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले त्यावर धनंजय मुंडेंना कुणाचा राजकीय आशीर्वाद आहे असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा आशीर्वाद धनंजय मुंडेंना आहे. आशीर्वाद का दिला आहे ते त्या दोघांनी सांगावं. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचा राजीनामा घेतला पाहिजे. हे राज्य कुठल्या दिशेला तुम्ही घेऊन जात आहात? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, अमित शाह यांना हे सगळं दिसत नाही का? महाराष्ट्रातलं राज्य असं चाललं होतं का? ज्यांना आशीर्वाद दिला आहे ते तुमचे लाडके भाऊ आहेत की जावई आहेत?

देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलवादाचे कमांडर-राऊत

परळी विधानसभा मतदारसंघातल्या ११८ बुथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलं नाही. यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. परळी हे त्याचं उदाहरण आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे घडलं आहे. देवेंद्र फडणवीस हे अर्बन नक्षलवादाचे कमांडर आहेत. अर्बन नक्षलवाद कुणी पोसत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भाजपा पक्ष आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Story img Loader