Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज निवडणूक आयोग हे सरकारच्या ताटाखालचं मांजर आहे अशी टीका केली आहे. तसंच त्यांनी राज ठाकरेंवरही गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाही तर दिल्लीतल्या राक्षसांना अजूनही फोडाफोडी करायची आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
सगळं जग हे सांगतं आहे की ईव्हीएम घोटाळा आहे. जर निवडणूक आयोग हे म्हणत असेल की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही तर निवडणूक आयोगात घोटाळा आहे. सगळ्या जगाने ईव्हीएम नाकारलं आहे आणि हे शहाणे आले आहेत का? राजीव कुमार उद्या निवृत्त होतील मग मोदी त्यांना बक्षीस देतील अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
निवडणूक आयोग सरकारच्या ताटाखालचं मांजर-राऊत
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, घटनात्मक पदावरचे व्यक्ती यांच्याकडून हवी ती कामं करुन घ्यायची आणि त्यानंतर त्यांना बक्षीस द्यायचं, राज्यपाल करायचं, राजदूत म्हणून कुठे पाठवायचं हेच सुरु आहे. महाराष्ट्रात निवडणूक घोटाळा झाला, हरियाणात झाला आहे. निवडणूक आयोगाने मरकवाडीला येऊन बसलं पाहिजे, मरकवाडीच्या जनतेची मागणी होती की ते स्वखर्चाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार होतं. मग राजीव कुमार यांना तफावत दिसली असती. निवडणूक यंत्रणा भाजपाने हायजॅक केली आहे, लोकशाही हायजॅक केली आहे. लोकशाहीचं रक्षण करणारे चाचेगिरी करत आहेत. दिल्ली निवडणुकीतही मतदार यादीतला घोटाळा होतो आहे. महाराष्ट्रातही तेच झालं, हरियाणातही तेच झालं असाही आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोग सरकारच्या ताटाखालचं मांजर झाला आहे अशीही टीका राऊत यांनी केली.
वन नेशन वन इलेक्शन विधेयक हे हुकुमशाहीकडे वाटचाल करणारं-राऊत
वन नेशन वन इलेक्शन हे बिल लोकसभेत येऊ शकलेलं नाही. जेपीसीकडे म्हणजेच संसदेच्या संयुक्त समितीकडे हे विधेयक गेलं आहे. आज जेपीसीची पहिली बैठक आहे. आमच्या पक्षाचे सदस्य, इंडिया आघाडीचे सदस्य उपस्थित असतील अशीही माहिती संजय राऊत म्हणाले. तसंच वन नेशन वन इलेक्शनला आमचा विरोध आहे. कारण भविष्यात एक पक्ष एक निवडणूक, एक नेता एकच निवडणूक याकडे नेणारी ही योजना आहे अशीही टीका संजय राऊत यांनी केली. तसंच खासदार फोडण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाचे प्रयत्न सुरु आहेत असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न होतो आहे कारण…
शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटत नाहीत तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. पटेल यांना सांगितलं गेलं आहे की खासदारांचा कोटा पूर्ण करा. शरद पवारांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडले की तुम्हाला मंत्रिपद मिळेल. देशाला त्याचा काहीही उपयोग नाही. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं आहे. त्यामुळे फोडाफोडीचा नीच आणि निर्ल्लज प्रकार सुरु आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा तुम्ही जिंकला आहात तरीही तुमची फोडाफोडीची भूक भागत नाही. कार्यकर्ते, आमदार, खासदार फोडाफोडी सुरु आहे. देशाचं भाग्य तुम्ही काळ्या शाईने लिहिणं चालवलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत राक्षस बसले आहेत जे फोडाफोडी करत आहेत-राऊत
एकनाथ शिंदेंनी त्यांच्या संपर्कात कोण आहेत? ती नावं जाहीर करावीत. आज त्यांच्याकडे सत्ता आहे. दिल्लीत राक्षस बसले आहेत. ईडी, सीबीआय त्यांच्या हातात आहे. त्यामुळे ही फोडाफोडी सुरु आहे. भाजपाला किती आमदार, किती खासदार पाहिजेत त्यांचं भवितव्य काय? त्यांच्या तोंडावर हाडकं पडणार आहेत चघळायला. यात महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान याचा काही संबंध येत नाही. शरद पवारांच्या आमदारांना, खासदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला तरीही यात देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मुखवटे गळून पडत आहेत. तुमच्याही तिरड्या राजकारणातून उचलल्या जाणार आहेत कधीतरी हे विसरु नका. तेव्हा तुम्ही काय करणार? या देशाच्या इतिहासात तुमची नोंद लोकशाहीचे वाट लावणारे लोक अशी होणार आहे. अशीही टीका राऊत यांनी केली.
राज ठाकरेंच्या मनसेचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी-राऊत
“राज ठाकरेंच्या मनसेचा वापर होतो आहे, तो वापर कुणाविरुद्ध होतो आहे तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात होतो आहे. हा वापर मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी होतो आहे एवढंच मी सांगेन.” असं संजय राऊत म्हणाले आहेत. राज ठाकरे कायमच त्यांच्या भाषणात हा मुद्दा मांडतात की त्यांनी शिवसेना सोडली पण फोडाफोडी केली नाही. नवा पक्ष स्थापन केला. आता संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी होतो आहे असं म्हटलंय. यावर राज ठाकरे उत्तर देणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.