Sanjay Raut : घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमती ५० रुपयांनी वाढल्या आहेत. केंद्र सरकारतर्फे यासंदर्भातली घोषणा सोमवारी करण्यात आली. दरम्यान यावरुन सातत्याने सरकारवर टीका केली जाते आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तर थेट स्मृती इराणी यांना आंदोलन करण्यासाठी बोलवलं आहे. हा पक्षाचा विषय नसून गृहिणींशी संबंधित विषय आहे असंही राऊत म्हणाले आहेत.

निर्मला सीतारमण महागाईत तेल ओतण्याचं काम करत आहेत-राऊत

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. मग भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किंमती का वाढाव्यात? ही कसली पाकिटमारी किंवा वसुली सुरु आहे? कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतर जर भारतीयांना दिलासा मिळत नसेल तर निर्मला सीतारामण महागाईत तेल ओतण्याचं काम करत आहेत. सिलिंडर ५० रुपयांनी वाढला आहे. लाडक्या बहिणींचं बजेट कोलमडलं आहे असं संजय राऊत म्हणाले.

स्मृती इराणी यांना सिलिंडर आम्ही देतो त्यांनी आंदोलनाला येऊन बसावं-राऊत

माझं स्मृती इराणी, कंगना रणौत यांना आवाहन आहे, त्यांच्यासह भाजपाच्या महिला नेत्यांना आवाहन आहे महिलांचं आंदोलन करावं. महिलांचं आंदोलन करण्यासाठी मी स्मृती इराणींना आमंत्रित करतो आहे. हा प्रश्न राजकीय नाही तर महिलांच्या रोजच्या जगण्याचा आहे. युपीएचं राज्य असताना सिलिंडरचे दर वाढले तेव्हा स्मृती इराणी रस्त्यावर सिलिंडर टाकून बसल्या होत्या, आता सिलिंडर आम्ही पुरवू तुम्ही रस्त्यावर बसायला या असं संजय राऊत म्हणाले आहेत.

कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत-राऊत

कच्च्या तेलाच्या किंमती जागतिक बाजारात घसरल्या आहेत. त्या पाहता भारतासारख्या देशात पेट्रोल आणि डिझेल ५० रुपयांवर स्थिर असायला पाहिजेत. शिवाय सिलिंडरच्या किंमती ४०० रुपयांनी खाली यायला हव्या. आम्हाला अर्थ शास्त्र शिकवू नका. ते आम्हालाही कळतं, या देशात प्रत्येक बाबतीत सामान्य माणसं, गृहिणींची लूट सुरु आहे. निवडणूक आली की लाडकी बहीण सारखी योजना आणायची आणि मग निवडणूक जिंकल्यानंतर ती योजना वाऱ्यावर सोडायचं आहे हेच चाललं आहे असाही टोला राऊत यांनी लगावला.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरुन भाजपावर टीका

भाजपाच्या विचारांचे लोक जिथे आहेत तिथे राहू केतू घुसले आहेत. हे सगळे मोदी शाह यांचे अंधभक्त आहेत. अंधभक्त धर्मांध असतो त्याला सामान्यांचा विचार करता येत नाही असाही टोला संजय राऊत यांनी भाजपाला दीनानाथ मंगेशकर प्रकरणावरुन लगावला आहे. आता या सगळ्याला सरकारकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.