उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला असून ते नुकतेच तुरुंगाबाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ते मागील साधारण ३ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका करत आहेत. तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल सांगताना ते लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांचा उल्लेख करत आहेत. असे असताना तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत पुन्हा एकदा सकाळच्या पत्रकार परिषदा घेणार का? ते पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांना घेरणार का? असा प्रश्न विचारला जातोय. याच प्रश्नाचे राऊत यांनी उत्तर दिले आहे. लिहिणाऱ्या आणि बोळणाऱ्या लोकांनाच तुरुंगात टाकले जाते. मी टिळक आणि वीर सावरकर यांच्याशी तुलना करणारच, असे राऊत म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’ने आयोजित आलेल्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा >>> “कोणावरही वेळ येऊ नये” तुरूगांत घालवलेल्या दिवसांवर बोलताना राऊत म्हणाले, “मी तर विचार करतो की…”
“माझ्या बोलण्याचा कोणाला त्रास का व्हावा. मी एक राजकीय नेता आहे. मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे. मी संपादक आहे. मी ४० ते ५० वर्षांपासून पत्रकारिता करतो. बोलणे आणि लिहिणे हा माझा पेशा आहे. या देशात तुरुंगात गेलेला प्रत्येक माणूस हा बोलणारा आणि लिहिणारा होता. लोकमान्य टिळक, वीर सावरकर संपादक होते. मी तुलना करणारच. अटलबिहारी वाजपेयी पत्रकार होते. लालकृष्ण अडवाणी पत्रकार होते. या देशात बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांचाच त्रास होतो, असे संजय राऊत म्हणाले.
“जगभरात लिहणारे आणि बोलणारेच त्रासदायक ठरतात. म्हणूनच त्यांना तुरुंगात टाकले जाते. हिटरलरने चित्रकार, व्यंगचित्रकार, बोलणारे, लिहिणारे यांनाच तुरुंगात टाकले. सद्दाम हुसेन, गदाफी यांनी लिहिणारे तसेच बोलणाऱ्यांना चिरडून टाकले. मात्र आपल्या देशात हे होता कामा नये,” असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >>> आदित्य ठाकरे राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेत! नितेश राणेंना विचारलं असता हसून म्हणाले, “दोन ‘पप्पू’ भेटत असतील तर मी…”
“मी एक साधारण मध्यमवर्गीय नोकरी करणारा माणूस आहे. मला ज्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, ते प्रकरणच मला माहीत नाही. पत्राचाळ कुठे आहे, हेच मला माहिती नाही. एखाद्या गोष्टीशी संबंध असणे, नाते असणे हा गुन्हा नाही,” असेदेखील संजय राऊत म्हणाले.