विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार अलिकडेच एका मुलाखतीच्या वेळी “मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल!” असं म्हणाले होते. तेव्हापासून राज्यात अजित पवारांची मोठी चर्चा आहे. दरम्यान, कालपासून अजित पवारांच्या समर्थकांनी त्यांचे अनेक ठिकाणी पोस्टर आणि बॅनर लावले आहेत. यापैकी बहुतांश बॅनर्सवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे. तर काही बॅनर्सवर लोकांच्या मनातले मुख्यमंत्री असा उल्लेखही पाहायला मिळाला. नवी मुंबई, मुंबई आणि नागपुरातले बॅनर्स लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
“वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादा पक्का!” अशा आशयाचे बॅनर्स नागपूरकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. नागपुरात लक्ष्मी भुवन चौकात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं नाव घेत यावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली.
हे ही वाचा >> बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांच्या भेटीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले…
संजय राऊत यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित केली. यावेळी त्यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या बॅनर्सबाबत विचारलं. तेव्हा संजय राऊत म्हणाले की, “म्हणूनच, कोणते बॅनर जोरदार आहेत हे पाहण्यासाठी अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत.” खरंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (२६ एप्रिल) रात्री दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत आहेत. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र भुषण कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. या महिन्यातला हा त्यांचा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. संजय राऊतांनी शाहांच्या या दौऱ्यावरदेखील आज टीका केली.