Sanjay Raut was in Jail :मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. संजय राऊत साडेतीन महिने तुरुंगात होते. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी ते तुरुंगातून बाहेर आले आणि लगेच राजकारणात सक्रीय झाले. दरम्यान, तुरुंगात कशी वागणूक मिळाली? तिथली दिनचर्या कशी होती? यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तुरुंगातील दिवस कसे होते यावर संजय राऊत एक पुस्तक देखील लिहीत असल्याचं त्यांनी सांगितलं. मित्रम्हणे या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तुरुंगातील दिनचर्येबद्दल सांगितलं.
संजय राऊत म्हणाले, “सुरुवातीला मला ईडीने अटक केली तेव्हा मी ईडीच्या तुरुंगात होतो. सात-आठ दिवसांनी न्यायालयाने मला ऑर्थर रोड तुरुंगात पाठवलं. तुरुंग हा तुरुंगच असतो, तिथे नेत्यांना वेगळ्या सुविधा दिल्या जात असतील, अशी काही लोकांची धारणा आहे, जी चुकीची आहे. तिथलं वातावरण भयान असतं. तुमच्या आजूबाजूला अनोळखी लोक असतात. तुरुंगाच्या भिंती तुम्हाला खायला उठतात. तिथले वीजेचे दिवे कधीच बंद केले जात नाहीत. दिव्यांच्या उजेडात झोपावं लागतं. तुरुंगातील ज्या खोलीत मी होतो, त्याच्या बाजूच्या खोलीत अनिल देशमुख (माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार) होते. तसेच समोरच अजमल कसाबचा (दहशतवादी) तुरुंग होता. तिथे कसाबला ठेवलं होतं. त्याचं साहित्य अजूनही तिथेच पडून आहे. त्याची बॅग, त्याच्या जप्त केलेल्या वस्तू व रायफल तिथे आहे. कसाबचा खटला तिथे चालवला होता”.
तुरुंगात लोक मानसिकरित्या कोलमडून पडतात : राऊत
ठाकरे गटातील खासदार म्हणाले, “तुरुंगात आपल्याला शिस्त तिथली पाळावी लागते, सकाळी लवकर उठावं लागतं, त्यानंतर चहा मिळतो तो घ्यायचा, ११ वाजता त्यांचं जेवण येतं. तुम्हाला ११ वाजण्याच्या आधी किंवा नंतर जेवण मिळत नाही. ते देतील त्या वेळेत जेवण घ्याचं. रात्री सात वाजता जेवण दिलं जायचं. तुम्हाला तुरुंगाचं वेळापत्र पाळावं लागतं. तुरुंगात गेल्यानंतर लोक मानसिकरित्या कोलमडून पडतात. मी माझ्यावर त्याचा काही परिणाम होऊ दिला नाही, कारण मला खात्री होती की आज ना उद्या मी इथून बाहेर पडणार आहे. तुरुंगात प्रत्येक ठिकाणी तुमचे कपडे काढून तुम्हाला तपासलं जातं, तुम्ही गृहमंत्री असाल किंवा एखाद्या साधा गुन्हेगार, तुम्हाला या प्रक्रियेतून जावंच लागतं”.
राऊत म्हणाले, “अनिल देशमुख माझ्याबरोबरच तुरुंगात होते. तुरुंगात आम्ही खिमा पाव बनवून खायचो. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायचो. तुरुंगात आठवड्यातून एक दिवस मांसाहार दिला जातो. त्या दिवशी आम्ही कुठून तरी मटणाची व्यवस्था करायचो, तुरुंगात काही ओळखीचे लोक असतात, चाहतेही असतात. त्यांच्या मदतीने हे सगळं करायचो”.