Cricket World Cup 2023 IND vs AUS : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर विक्रमी सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर आपल्या देशाचं नाव कोरलं. दरम्यान, समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव म्हणत आहेत की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. यावरून आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रियादेखील येऊ लागल्या आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावरून बीसीसीआयवर टीका केली आहे.
काही महिन्यांपूर्वी महिला कुस्टीपटूंनी पुकारलेल्या आंदोलनाला कपिल देव यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळेच कपिल देव यांना विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं निमंत्रण दिलं नाही का? असा प्रश्न जयराम रमेश यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर उपस्थित केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, भारताचा पराभव झाला, त्यामुळे लोकांना वाईट वाटलं, त्यात आपणही सहभागी व्हायला हवं. अर्थात भारतीय संघ उत्तम खेळला. ते हरले तरी त्यांचं अभिनंदन करायला हवं कारण त्यांच्यात जिंकण्याची जिद्द होती. तसेच भाजपाच्या दुःखात मी सहभागी आहे. कारण, भाजपा अशा थाटात होती की, वर्ल्डकप आम्हीच जिंकणार आहोत, भारत वर्ल्डकप जिंकला असता तर आनंदच झाला असता. परंतु, ज्या प्रकारचं राजकारण सुरू होतं, भाजपाकडून निकालानंतरची ज्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. दुर्दैवाने त्यावर पाणी फेरलं गेलं.
हे ही वाचा >> VIDEO : भारताच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराची मुलगी ढसा ढसा रडली; म्हणाली, “तो पॅट कमिन्स…”
संजय राऊत म्हणाले, “माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांचं एक निवेदन मी ऐकलं. ज्यांनी या देशातला सर्वात पहिला विश्वचषक मिळवून दिला. भारत जगज्जेता आहे आणि पुढेही होऊ शकतो असा विश्वास ज्यांनी या देशाला दिला, त्या विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला म्हणजेच कपिल देव यांना आणि त्याच्या संघाला अंतिम सामन्यासाठी आमंत्रित केलं नाही. कारण, कपिल देव यांचं तिथे आगमन झालं असतं तर इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं. त्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत हरला याचं दुःख असलं तरी ज्या प्रकारचं राजकारण पडद्यामागे चालू आहे, त्यावर देशात नक्कीच चर्चा होईल.” हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. त्यामुळे संजय राऊत यांनी नाव न घेता मोदी आणि शाह यांना टोला लगावला आहे.