शिवसेना पक्षाचा येत्या १९ जून रोजी वर्धापन दिन आहे. वर्षभरापूर्वी शिवसेना पक्ष फुटला आणि पक्षाचे दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदार खासदारांना बरोबर घेत वेगळा गट स्थापन केला आणि आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाने देखील एकनाथ शिंदेंना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं. दरम्यान, पक्षाच्या वर्धापन दिनावरून गोंधळ होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. अशातच भाजपाने शिवसेनेच्या वर्धापन दिनावरून ठाकरे गटाला टोला लगावला आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच टीव्ही ९ मराठीला मुलाखत दिली. यावेळी राऊत यांना विचारण्यात आलं की, भाजपाने ठाकरे गटावर टीका करत म्हटलं आहे की, शिवसेनेचा वर्धापन दिन होणार आहे का? तसेच ठाकरे गट नेमका कोणता वर्धापन दिन साजरा करणार? कारण खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यावर काय प्रतिक्रिया द्याल. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, भाजपाने उठाठेव करायची गरज नाही. त्यांनी आमचं वकीलपत्र कधी घेतलं?
खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही पाहिलेली भारतीय जनता पार्टी आता राहिली नाही, आम्ही अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची पाहिलेली भाजपा आता शिल्लक नाही, असं आम्ही म्हणालो तर त्यांना चालेल का. शिवसेनेचं काय ते आम्ही पाहू. तुम्ही कधी शिवसेनेचे वकील झालात? ही भाजपा म्हणजे बेईमानांना आणि गद्दारांना उत्तेजन देणारी आहे.
संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचा वर्धापन दिन दणक्यात साजरा करू. मुळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कधी स्थापन केली. त्यांच्याबरोबर जे काही ४० लोक वगैरे आहेत त्यांनी शिवसेना कधी स्थापन केली? शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली. त्यांनी उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीच्या मताने त्यांनी उद्धव ठाकरेंकडे पक्षाची धुरा सोपवली आहे. शिवसेना ही ठाकऱ्यांची आहे. जिथे ठाकरे तिथे शिवसेना.
हे ही वाचा >> “भारताची नवी संसद सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी”, दिग्विजय सिंह आणि तृणमूलने पंतप्रधान मोदींना घेरलं
खासदार राऊत म्हणाले, आम्ही येत्या १९ जूनला पक्षाचा वर्धापन दिन साजरा करू. त्याआधी १८ जून रोजी शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन आहे. मुंबईतल्या वरळी येथे हे अधिवेशन होईल. संपूर्ण राज्यातून या अधिवेशनला शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते येतील. या अधिवेशनात शिवसेनेची पुढची दिशा ठरेल.