मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज (१६ सप्टेंबर) संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळ आणि अधिकारीवर्ग संभाजीनगरमध्ये उपस्थित आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेला सामोरे जातील. दरम्यान, संधी मिळाली तर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाऊन त्यांना प्रश्न विचारेन असं वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल (१५ सप्टेंबर) केलं होतं. दरम्यान, राऊत यांनी आज पुन्हा एकदा यावर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, काल (१५ सप्टेंबर) मला पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर मी म्हटलं हे प्रश्न तुम्ही सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजेत. राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक फुल आणि दोन हाफ यांची छत्रपती संभाजीनगरममध्ये पत्रकार परिषद होत आहे. त्यात एक डाऊटफुल आणि दोन हाफ आहेत. त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारा. मला संधी दिली तर मी नक्कीच तिथे जाऊन, या पत्रकार परिषदेत जाऊन प्रश्न विचारेन. मी पत्रकार आहे. परंतु, माझ्या वक्तव्याने इथे (मुंबईत) गोंधळ झाला.

मी पत्रकार परिषदेला जाईन म्हटल्यावर त्या पत्रकार परिषदेलाच नको तेवढी सुरक्षा दिली. पत्रकारांवर निर्बंध घातले. पत्रकारांसाठी पासेस तयार केले. यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. तुम्हाला आमची एवढी भिती आहे का? पत्रकार म्हणून माझा जन्म झाला आहे. कालच्या वक्तव्यानंतर रात्री पोलीस मला भेटायला आले. मला अधिकाऱ्यांचे फोन आले. मी फक्त म्हणालो की मला दोन प्रश्न विचारायचे आहेत तर तुमची एवढी धावपळ होते. त्यामुळे मला असं वाटतं की जे प्रश्न तुम्ही विरोधकांना विचारत आहात ते तुम्ही पत्रकारांनी या सरकारला विचारायला हवेत.

यावर एका पत्रकारने संजय राऊत यांना प्रश्न विचारला की तुमची या पत्रकार परिषदेला जाण्याची इच्छा आहे का? तिथल्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं, तुम्ही या पत्रकार परिषदेचा पास घेतला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, आयुक्तांकडे कदाचित जास्त माहिती असेल. मी संपादक आहे, या महाराष्ट्राचा सर्वात ज्येष्ठ संपादक आहे. मी पत्रकार आहे आणि वार्ताहरही आहे. मुळात माझी सुरुवातच त्यापासून झाली आहे. माझी इच्छा झाली तर मी त्या पत्रकार परिषदेला जाईन. परंतु, मला अडवण्याचा प्रयत्न होईल आणि त्यामुळे गोंधळ होईल. मला तो गोंधळ नको आहे.

हे ही वाचा >> “डेंग्यूसारखाच सनातन धर्मही….”, उदयनिधींच्या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून पहिल्यांदाच भाष्य

दरम्यान, मराठवाड्यात होत असलेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत संजय राऊत म्हणाले, २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठक पार पडली होती. त्यावेळी फडणवीसांनी मराठवाड्यासाठी ५० हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. २०१६ सालच्या योजनांचा पत्ता नाही. पण, मुख्यमंत्री म्हणून घोषणा करणारे उपमुख्यमंत्री म्हणून येत आहेत. एवढाच काय तो फरक. बाकी सगळा मराठवाडा जसाच्या तसा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut says if i wish will attend cm eknath shinde press conference asc
Show comments