Sanjay Raut on Kunal Kamra : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केल्यामुळे शिंदेंच्या समर्थकांनी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केली आहेत. शिवसेना (शिंदे) कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा याने ज्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम घेतला होता त्या हॉटेलची व तिथल्या स्टुडिओची तोडफोड केली. पाठोपाठ शिवसेना (शिंदे) नेत्यांनी आरोप केला आहे की कुणाल कामरा याने शिवसेना (ठाकरे) नेत्यांच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेंवर टीका केली. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांनी कुणाल कामरा व शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांचे फोटो जारी केले आहेत. यावर आता राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, “होय, माझे कुणाल कामराबरोबर फोटो आहेत. मी त्याला ओळखतो. मी ते नाकारत नाही. मात्र, या लोकांनी (शिंदे गट व भाजपा) त्यांच्या लोकांचे फोटा का दाखवले नाहीत? कुणाल कामरा हा अनेक वर्षांपासून असे कार्यक्रम करत आहे. यापूर्वी काँग्रेसचं सरकार असताना, मनमोहन सिंह यांचं सरकार असताना देखील कामराने अशी टीका केली होती. परंतु, काँग्रेसवाल्यांनी स्टुडिओ तोडले नाहीत. तो स्टुडिओ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं व्यासपीठ होतं. तसेच या सत्ताधाऱ्यांना काल समजलं की त्या स्टुडिओचं कामकाज अनधिकृत होतं. इतक्या वर्षांनी, तुमच्यावर टीका झाली तेव्हा तुम्हाला साक्षात्कार झाला का? ते बांधकाम अनधिकृत असल्याचं तुम्हाला काल समजलं का? तुम्ही तरुण कलाकारांचं व्यासपीठ तोडलंत.

…तर मंत्र्यांच्या बंगल्यांवर कारवाई करावी : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, “तुम्ही कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करू शकत होता. त्यावर कोणाचीच हरकत नव्हती. औरंगजेबाने देखील मंदिरं तोडली होती. तुम्ही काल लोकशाहीचं मंदिर तोडलंत. यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात. तुम्हाला अनधिकृत बांधकामं तोडायची असतील तर मंत्र्यांच्या बंगल्यांवर बुलडोझर फिरवा. अनेक मंत्र्यांनी आपल्या बंगल्यांमध्ये महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या अतिरिक्त बांधकामं केली आहेत. वर्षा बंगल्यापासूनच सर्व बंगल्यांचं निरिक्षण करावं. कायदा हा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे.”

“कुणाल कामराने काहीच चुकीचं केलं नाही”

दरम्यान, कुणाल कामरा याने म्हटलं आहे की तो माफी मागणार नाही. यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, “कुणाल कामरा याने काहीच चुकीचं केलेलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार, चोराला चोर आणि लफंग्याला लफंगा म्हणणं हा काय देशद्रोह असतो का? औरंगजेबाला, त्याला मदत करणाऱ्यांना आपण बेईमानच म्हणतो. या लोकांना काही वेगळं विशेषण वापरायचं असेल तर तुम्ही (सरकारने) नवीन शब्द तयार करावा, शब्दकोश आणावा, आम्ही तो स्वीकारू.”

“कुणाल कामरा माफी मागणार नाही”

संजय राऊत म्हणाले, “कुणाल कामरा माफी मागणार नाही. मी त्याला ओळखतो. कारण त्याचा आणि माझा डीएनए सारखाच आहे. तो झुकणार नाही. तुम्हाला त्याच्यावर कारवाई करायचीच असेल तर कायदेशीर मार्ग पत्करा. तो चुकला असेल तर त्याला अटक करून कायद्याच्या मार्गाने त्याच्यावर कारवाई करा. तो त्याची कायदेशीर लढाई लढेल. मात्र, शिंदेंचे समर्थक गुंडगिरी करत आहेत. त्यांना मी एवढंच सांगेन की बहुमत चंचल असतं हे लक्षात ठेवा.”