मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना फसवणुकीद्वारे विजयी घोषित करण्यात आल्याचा दावा करणारी याचिका शुक्रवारी (२१ जू) उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. तसेच, वायकर यांना विजयी घोषित करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अवैध ठरवून तो रद्द करण्याची मागणीही याचिकाकर्च्यांनी केली आहे. पाठोपाठ, रवींद्र वायकर यांना आज (२४ जून) १८ व्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनात खासदारकीची शपथ देऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे. वायकर यांच्याबाबत दिलेला निकाल चुकीचा असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात सुरूवातीला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना दोन वेळा विजयी घोषित करण्यात आलं होतं. परंतु, फेरमोजणीच्या मागणीनंतर वायकर यांना अवघ्या ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचं काम पारदर्शीने केलं नसल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या कीर्तिकर यांना मतमोजणीनंतर विजयी घोषित करण्यात आलं होतं. नंतर रवींद्र वायकर यांनी टपाल मतपत्रिका पुनर्मोजणीची मागणी केली. त्याचवेळी फेरमतमोजणी देखील पार पडली. अखेर वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आलं.
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मागणी केली आहे की रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये. राऊत म्हणाले, “आपल्या देशात कायदा आणि संविधान अस्तित्वात असेल तर रवींद्र वायकर यांना आज खासदारकीची शपथ दिली जाणार नाही. कारण या सत्ताधाऱ्यांनी घोळात घोळ घालून रवींद्र वायकर यांना विजय दिला आहे. या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे त्याचबरोबर आम्ही निवडणूक आयोगाला आणि लोकसभा सचिवालयाला याबाबतची माहिती कळवली आहे. अत्यंत वादग्रस्त पद्धतीने रवींद्र वायकर यांना विजयी घोषित केलं आहे.”
हे ही वाचा >> “…तेव्हा आपल्याच घरभेद्यांनी घर फोडलं”, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला? म्हणाले, “यंदा जळगावात…”
संजय राऊत म्हणाले, “मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात चुकीच्या मार्गाने निकाल दिला. त्यामुळे लोकांच्या मनात संशय आहे. आमची मागणी आहे की लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांनी रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये. आता आम्ही मागणी केली आहे, त्यावर काय होतंय ते पाहूया. कायद्याचं किती पालन होतंय हे लवकरच आपल्याला कळेल. सत्ताधाऱ्यांनी लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्रितपणे आवाज उठवणार आहोत आणि आम्हा विरोधकांचा आवाज संसदेत घुमणार आहे. संसदेत आता नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा आवाज चालणार नाही. तर इंडियाच्या २४० खासदारांचा आवाज आता घुमणार आहे.”