आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नितीश कुमार यांनी देशभरातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या तसेच त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. या भेटीनंतर त्यांनी या नेत्यांना पाटणा येथे बैठकीला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार आज (२३ जून) पाटण्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. काहीच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे.
या बैठकीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून पक्षाचे प्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या बैठकीला हजर असतील. हे नेते काही वेळापूर्वी मुंबईहून रवाना झाले आहेत.
दरम्यान, या बैठकीला जाण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी संजय राऊत म्हणाले, आजचा पटना दौरा फक्त आमचा नाहीये. संपूर्ण देशातल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी, वेगवेगळ्या पक्षांचे नेते तिथे जणार आहेत. २०२४ च्या निवडणुकीसाठी काय-काय करता येईल यावर चर्चा करण्यासाठी आजची बैठक आहे. कारण २०२४ ची लोकसभा निवडणूक ही बहुदा देशातली शेवटची निवडणूक असेल असं सर्वांचं मत आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्ष पाटण्याला जमत आहेत. नितीश कुमार या बैठकीचे निमंत्रक आहेत.
हे ही वाचा >> पाटण्यातल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत कोणती रणनीती ठरवली जाणार? शरद पवार म्हणाले…
खासदार संजय राऊत म्हणाले, आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार जात आहेत. उद्धव ठाकरे जात आहेत. राहुल गांधीसुद्धा येत आहेत. काही वेळापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिथे पोहोचल्या आहेत. अनेक नेते आधीच पाटण्यात पोहोचले आहेत. ११.३० वाजता ही बैठक सुरू होईल. ही बैठक संध्याकाळपर्यंत चालेल. यात एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एकत्र जमणं याला महत्त्व आहे. यातून आजच चमत्कार होईल असं नाही. परंतु एकत्र जमून चर्चा करू. आगामी काळात कशी पाऊलं टाकता येतील, काय काय करता येईल? यावर चर्चा करू. खास करून एकास एक उमेदवार कसा देता येईल यावर चर्चा होईल.