राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं मविआ सरकार कोसळल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच मविआची संयुक्त सभा झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या सभेला महाविकास आघाडीतील ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमधील सर्व प्रमुख नेत्यांचा सहभाग होता. मात्र, काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व्यासपीठावर कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. नाना पटोलेंच्या नाराजीच्या चर्चांना आता उधाण आलं असून त्यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना खुलासा केला आहे.
नाना पटोले ऐनवेळी गैरहजर?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मविआच्या सभेतील गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार नाना पटोले या सभेला हजर राहणार होते, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार ते सभेत काय बोलणार? याविषयीही अंदाज बांधले जात होते. मात्र, सभेच्या काही वेळ आधी नाना पटोले सभेला हजर राहणार नसल्याचं समोर आलं. त्यासाठी नाना पटोलेंच्या प्रकृतीचं कारण देण्यात आलं होतं.
नाना पटोले आज गुजरातमध्ये!
दरम्यान, रविवारच्या मविआच्या सभेला प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देऊन गैरहजर राहिलेले नाना पटोले आज मात्र गुजरातमध्ये राहुल गांधींसमवेत दिसणार आहेत. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला नाना पटोलेंचीही उपस्थिती असेल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मविआच्या सभेलाच मग नाना पटोले गैरहजर का होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संजय राऊत यांचं स्पष्टीकरण!
दरम्यान, या सर्व चर्चांवर संजय राऊतांनी स्पष्टीकरण देताना नाना पटोलेंची प्रकृती खरंच बरी नसल्याचं सांगितलं. “राज्यभरात मविआच्या सभा घेण्याचं एक वेळापत्रक ठरलेलं आहे. पुढे पाहू काय होतंय. पण कालची सभा अत्यंत उत्तम रीतीने पार पडली. नाना पटोले काल उपस्थित नव्हते हे खरं आहे. पण नाना पटोलेंची प्रकृती बरी नाहीये. तुम्ही त्यांना आत्ताही फोन केला, तरी त्यांच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की त्यांची प्रकृती बरी नाही. कालच्या सभेला ते येण्याच्या तयारीत होते. पण ते मुंबईतल्या निवासस्थानी काल दिवसभर झोपूनच होते”, असं संजय राऊत म्हणाले.
“दंगलखोर कोण हे सगळ्यांना ठाऊक! भाजपाने दंगली घडवण्यासाठी…” संजय राऊत यांचा गंभीर आरोप
“मला त्यांच्याशी बोलतानाही जाणवलं की ते आजारी आहेत. पण कालच्या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातही होते. हे सगळे काँग्रेसचंच प्रतिनिधित्व करत होते. असं नाही की काँग्रेस नव्हती. काँग्रेसचे अनेक नेते काल व्यासपीठावर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचेही सगळे प्रमुख नेते होते. शिवसेनेचे प्रमुख नेते होते. आणि पुढच्या सभेला नाना पटोले नक्कीच असतील”, असं राऊत म्हणाले.
“आज नाना पटोलेंना गुजरातला राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावायची असल्यामुळेच त्यांनी काल आराम केला”, असंही संजय राऊतांनी नमूद केलं.