राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून अजित पवार गट आणि शरद पवार गटात संघर्ष सुरू आहे. हाच संघर्ष आगामी निवडणुकांमध्येही पाहायला मिळणार आहे. दोन्ही गटांमधील नेते एकेमकेांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांच्या पत्नी बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान देणार असल्याच्या बातमीने वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान, यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शरद पवारांच्या पक्षाचा महाविकास आघाडीतला साथीदार असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, मला वाटत नाही की, बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी निवडणूक होईल. त्यामुळे या अफवा बंद करा.
संजय राऊत म्हणाले, या सगळ्या अफवा आहेत. असं होणार नाही. राजकारण सगळ्यांना कळतं. आम्हीही महाराष्ट्रात राजकारण करतोय. आम्हालाही ते कळतं. पवार कुटुंबाविषयी आम्हाला माहिती आहे. बारामतीचं राजकारण आम्हालाही माहिती आहे. त्यामुळे जो कोणी या अफवा पसरवतोय, त्याने हे काम थांबवावं.
दरम्यान संजय राऊत यांनी बारामतीत कोणीही लढलं तरी सुप्रिया सुळेच जिंकतील असं ठणकावून सांगितलं.
हे ही वाचा >> “मनोज जरांगेंच्या ‘या’ मागणीला आमचा विरोध”, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य
शरद पवारांच्या गटातील आमदार रोहित पवार यांनीही मंगळवारी याविषयी प्रतिक्रिया दिली. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले, अशा चर्चांवर कोणीही विश्वास ठेवू नये. एखाद्या पक्षाकडून उमेदवारी घोषित केली जात नाही, तोवर अशा चर्चा करून वेळ वाया घालवू नये. याबाबतचा निर्णय भाजपा आणि त्यांच्याबरोबर गेलेले नेते घेतील. परंतु, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळेच उभ्या राहतील. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण उभं राहतंय? हे आपल्याला येत्या काळात बघावं लागेल.