शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये आज (२० मे) महाप्रबोधन यात्रा आयोजित करण्यात आली असून यावेळी संजय राऊत आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अधारे बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. तत्पूर्वी दोघांनी परळीच्या वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी परळीचे आमदार धनंजय मुंडेदेखील त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. वैद्यनाथांच्या दर्शनानंतर राऊत यांनी वेगवेगळ्या राजकीय विषयांवर पत्रकारांशी बातचित केली.
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा एखादा पेचप्रसंग येतो तेव्हा मला गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते. आमची युती (शिवसेना – भाजपा) २५ वर्ष टिकली, कारण गोपीनाथवारांसारखी माणसं होती. या काळात मतभेद झाले असतील, पण हे मतभेद दूर करणाऱ्यांमध्ये गोपीनाथराव पुढे होते. ठाकरे परिवाराशी त्यांचे चांगले संबंध होते. ते म्हणायचे शिवसेना आणि भाजपाचे रक्ताच्या नात्याचे संबंध आहेत.” संजय राऊत म्हणाले, आम्ही जी भाजपा पाहिलीय ती आता कुठे दिसत नाही. आम्ही दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींची तर महाराष्ट्रात गोपीनाथरावांची भाजपा पाहिली.
गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाबद्दल आणि वारशाबद्दल संजय राऊत म्हणाले, अनेकांकडे वारसा असतो, परंतु त्या नेतृत्वाची बरोबरी कोणी करू शकत नाही. गोपीनाथरावांची बरोबरी पण कोणी करू शकत नाही. आम्हाला पंकजाताईंकडून अपेक्षा आहे की, गोपीनाथराव ज्या निर्भयपणे, बेडरपणे राजकारणात वावरले, झुंजले त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली, त्यांच्यामुळे भाजपात अनेक कार्यकर्ते निर्माण झाले. पंकजाताईंनीदेखील तेच करावं. गोपीनाथरावांसारख्या नेत्याने जो संघर्ष केला हे त्याचंच फळ आहे.
हे ही वाचा >> “…तर मी वरळी विधानसभेचा राजीनामा देईन”; आदित्य ठाकरेंचं सुधीर मुनगंटीवारांना आव्हान
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर जीएसटीची धाड पडली आहे. याचा संदर्भ देत काही पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला की, पंकजाताईंची घुसमट होतेय असं बोललं जातंय त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल. यावर राऊत म्हणाले, त्यांची घुसमट होत असेल तर मुंडेसाहेबांचा वारसा म्हणून त्यांनी निर्भयपणे पुढे यायला पाहिजे.