शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. संजय राऊत म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत देऊन त्यांचं उपोषण मागे घेतलं होतं. परंतु, ही मुदत संपत आली तरी अद्याप राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकलेलं नाही. त्याउलट राज्य सरकारमधील काही लोक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करू लागले आहेत. तसेच या सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवता आलेला नाही. परंतु, सगळ्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर टिकाऊ आरक्षण देणार असल्याची जाहिरातबाजी केली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, एक महिन्यात तीन गरीब मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. परंतु, शिंदे-फडणवीस सरकारच्या डोळ्याची पापणीही हलली नाही. मग हे सरकार कशासाठी आहे? संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही तिथे बसवलेले मराठा मुख्यमंत्री आहात ना? मराठ्यांच्या मतांसाठी भाजपाने तुम्हाला तिथे बसवलं आहे ना? मग तुम्ही काय करताय? मला भिती वाटतेय की हे लोण पसरत गेलं तर आणखी काही लोक जीवाचं काहीतरी बरं-वाईट करून घेतील. तर, राज्य सरकार केवळ जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च करतंय.

संजय राऊत म्हणाले, मी आज अनेक वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर यांच्या जाहिराती पाहिल्या, आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ अशी घोषणा त्यांनी केली आहे. परंतु, तुम्हाला काय जाहिरातबाजीसाठी तिथे बसवलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची नुसती फोटोबाजी सुरू आहे. लोक आत्महत्या करत आहेत आणि हे लोक जाहिरातबाबजी करतायत. दुसऱ्या बाजूला तुमच्या सरकारमधील लोक वेगळ्याच दिशेने भूमिका घेत आहेत. त्यामुळे राज्यात दिवाळीआधी वातावरण बिघडू शकतं.

खासदार संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळ लोकांना भडकावत आहेत. शिंदे गटातले काही स्वतःला ९६ कुळी मराठा म्हणवणारे नेते लोकांना भडकावत आहेत. आम्ही मराठा आहोत, कुणबी नाही, त्यामुळे कुणबी जातप्रमाणपत्र घेणार नाही, असं म्हणत आहेत. तर भाजपाचे केंद्रातले मंत्री वेगळीच भाषा बोलत आहेत. मराठा समाजात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी सधन मराठ्यांनी ही रणनीति आखली आहे का?

हे ही वाचा >> “बुलढाण्याच्या शहीद अग्निवीराला ना पेन्शन, ना सरकारी योजनेचा लाभ”, रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

ठाकरे गटाचे नेते म्हणाले, हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. ज्यांच्याकडे फारशी शेती नाही, नोकरी नाही, ज्यांचा नोकरीसाठी संघर्ष सुरू आहे, अशा दुर्बल मराठा लोकांसाठी मनोज जरांगे पाटील लढा लढत आहेत. परंतु, त्यांनाही अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. या सर्व प्रकारामुळे मराठा तरुणांना वैफल्य येऊन, नैराश्य येऊन राज्यात आत्महत्या होत आहेत. त्यामुळे आता एक जरी आत्महत्या झाली तर मराठा नेते आणि संघटनांनी एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut says rich maratha leaders trying to divide manoj jarange patil movement for maratha reservation asc