Sanjay Raut On Ajit Pawar Birthday Hoarding : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या (२२ जुलै) त्यांचा ६४ वा वाढदिवस साजरा करतील. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंग्स लावले आहेत. यापैकी काही होर्डिंग्सवर अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. काही वेळापूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर भाष्य केलं. संजय राऊत म्हणाले, अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील.
खासदार संजय राऊत म्हणाले, अजित पवार भावी आहेत म्हणजे ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. काय घडामोडी घडत आहेत ते मलाही माहिती आहे. मग त्या घडामोडी कायदेशीर असतील, घटनात्मक असतील अथवा राजकीय असतील. परंतु अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर-लवकर जवळ येत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. मी याआधीही सांगितलं आहे की, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल.
संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांच्या वाढदिवसाला असे काही होर्डिंग्स लागलेत की नाही, ते मला माहिती नाही, मी काही ते पाहिलं नाही. परंतु ते लवकरच मुख्यमंत्री होतील हे सत्य आहे आणि हे सत्य आता शिंदे गटाने स्वीकारलं पाहिजे.
“माझा वाढदिवस साजरा करू नका”; अजित पवारांचं आवाहन
रायगडमधल्या इर्शाळवाडीत घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. यात आतापर्यंत १३ जण दगावले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली. अजित पवार यांनी त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांना आवाहन केलं आहे की, “कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नका. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर पैसे खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पूर्नउभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा.”