खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचे थेट संकेत दिले आहेत. तसेच ते म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केल्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं ठरू शकतं. लोकांनी याआधी उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे. ते महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मतदान केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनू शकतात. त्याचबरोबर बिनचेहऱ्याचं सरकार किंवा बिनचेहऱ्याची आघाडी चालणार नाही”. दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीतून प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी राऊतांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत बसून चर्चा करून निर्णय होणं आवश्यक आहे.”

शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हा एक मोठा धोका आहे. या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही मतदान केलं आहे. अर्थात आम्हा तिन्ही पक्षांची ताकद होती. तिन्ही पक्ष मिळून निवडणूक लढलो आणि यशस्वी झालो. परंतु, बिनचेहऱ्याची आघाडी किंवा बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही.”

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले, “अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. त्यामुळे आम्ही कोणतेही नाव जाहीर करू शकत नाही. प्रत्येक पक्ष त्यांच्याकडून एखादं नाव पुढे करू शकतो. ते नाव चर्चेत उपस्थित करू शकतो. त्यावर बसून चर्चा होईल. महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते त्यावर बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील. तसेच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते आमच्या सरकारचे प्रमुख होते. महाविकास आघाडीचं राज्यात सरकार असताना उद्धव ठाकरे त्या सरकारचे मुख्यमंत्री होते. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी फार चांगलं काम केलं होतं.”

हे ही वाचा >> महायुतीत जुंपली; “आम्हाला हलक्यात घेऊ नका”, राष्ट्रवादीच्या आमदाराचा इशारा, शिंदेंच्या आमदारानेही सुनावलं

दरम्यान, राऊत यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या शिंदे गटानेही भाष्य केलं आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “तुम्ही उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करत आहात. दुसऱ्या बाजूला, काँग्रेस स्वबळाची भाषा करू लागली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणताही चेहरा घेऊन निवडणूक लढू शकणार नाही. मुळात महाविकास आघाडीची एवढी क्षमता नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांचा चेहरा पाहिला आहे. परंतु, तो चेहरा कधी विधानभवनात अथवा मंत्रालयात दिसला नाही. त्यामुळे त्या चेहऱ्याला महाराष्ट्राच्या जनतेने घरी बसवलं.”