विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. गोऱ्हे यांनी शुक्रवारी (७ जुलै) एकनाथ शिंदे गटात रीतसर प्रवेश केला. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका होत आहे. गोऱ्हेंच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशावर आमदार अनिल परब आणि सुषमा अंधारे यांच्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, त्यांना पक्षाने सगळं काही दिलं याची आम्हाला लाज वाटते.
गोऱ्हे यांच्या शिवसेना प्रवेशावर तुमची काय प्रतिक्रिया? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, मला लाज वाटते. त्यांना पाच वेळा आमदारकी दिली, ती अजूनही सुरू आहे. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असती तर त्या राजीनामा देऊन गेल्या असत्या. त्यांना आतापर्यंत मिळालेलं प्रत्येक वैधानिक पद हे फक्त शिवसेना आणि ठाकऱ्यांमुळे मिळालं आहे.
संजय राऊत म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या पाच-पाच वेळा ज्यांना आमदारकी मिळाली, महिला आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं, विधान परिषदेचं उपसभापती पद दिलं गेलं, ही सगळी पदं मिळाल्यावरही जर एखादी व्यक्ती पक्ष सोडून जात असेल, त्याची कारणं काहीही असतील, विकासाचं कारण असेल, अन्याय असेल किंवा अजून काही, तर मला त्याची लाज वाटते.
हे ही वाचा >> “मी कुठल्या वयात निवृत्त व्हायचं? कुठे थांबायचं….”, शरद पवारांचा अजित पवारांना यांना थेट सवाल
खासदार संजय राऊत म्हणाले, या महाराष्ट्रालासुद्धा त्यांची लाज वाटते. ज्या विचारसरणीतून त्या शिवसेनेत आल्या होत्या. तरीसुद्धा त्यांना आम्ही जे जे हवं ते सगळं दिलं. पण चार पाच महिन्यांसाठी पद राहावं म्हणून जर कोणी अशा प्रकारची बेईमानी करत असेल तर आम्ही त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहतो.