मुंबईतल्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटाने शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज मागे घेतल्याने तिथे आता उबाठा पक्षाचा दसरा मेळावा होणार आहे. यावरून ठाकरे गटाने जल्लोषही केला आहे. दरम्यान, ज्या शिवाजी पार्कात शिवसेनेची स्थापना झाली, जिथे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली, तिथेच उबाठा गट काँग्रेसवर फुलं उधळणार, काँग्रेसचे विचार मांडणार, अशी टीका केली आहे. तसेच विचारांचा वारसा सांगण्याऱ्यांनी आधी आरसा पाहावा असा टोलाही लगावला आहे. या टीकाटिप्पणीला ठाकरे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
उबाठा पक्षातील खासदार संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी कमळाबाईच्या पदराखाली राजकारण करण्याचं धोरण कधी स्वीकारलं नाही. आम्ही काँग्रेसबरोबर आहोत, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहोत, कारण ही या महाराष्ट्राची राजकीय अपरीहार्यता आहे. संजय राऊत शिंदे गटाला उद्देशून म्हणाले, आम्ही आरसा पाहू, नाहीतर आणखी काही पाहू. परंतु, तुमच्याकडे कोणता वारसा आहे ते सांगा. हल्ली तुम्ही सकाळी उठल्यापासून फक्त नमो-नमोचा जप करताय.
हे ही वाचा >> Israel Hamas War : पॅलेस्टाईन नव्हे, ‘या’ देशात रचला इस्रायलवरील हल्ल्याचा कट, हमासला दोन देशांकडून मदत
संजय राऊत म्हणाले, तुम्ही जे. पी. नड्डांचा नाडा धरून चालताय. संपूर्ण मुंबईत बघा. नड्डांच्या स्वागताचे होर्डिंग लावले आहेत. हे काही शिवसेनेचं धोरण नाही. त्यामुळे तुम्ही (शिंदे गट) एकदा खरंच आरशात पाहा. मी तोच बाळासाहेबांनी निर्माण केलेला शिवसैनिक आहे का? हे बघा एकदा. ‘तो मी नव्हेच!’ या नाटकाऐवजी ‘मी तोच का?’ हे नाटक लिहायला घ्या.