राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली आहे. “ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू श्रीरामाने २४० च्या संख्येवर मर्यादित ठेवलं”, असं वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केलं आहे. याआधी आरएसएसचे अध्यक्ष मोहन भागवत यांनीदेखील भाजपाला खडे बोल सुनावले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतर नेत्यांनीही भाजपावर टीका केली आहे. यावरून आता विरोधी पक्षांमधील नेते संघाचं आणि संघाच्या भूमिकेचं कौतुक करत आहेत. दरम्यान, संघाकडून देशाला आणि जनतेला अपेक्षा असल्याचं मत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

संजय राऊत म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील नेत्यांची अलीकडची काही वक्तव्ये मी ऐकतोय. परवा सरसंघचालक मोहन भागवत देखील भाजपावर बोलले. ते म्हणाले, ‘लोकसेवकाने अहंकार बाळगू नये’. परंतु, आम्ही गेल्या १० वर्षांमध्ये केवळ अहंकारच अहंकार पाहिला आहे. केवळ ईर्ष्या, सूडाचं राजकारण, सत्तेचा गैरवापर पाहिला आहे. आम्ही हे पाहत असताना भाजपाची मातृसंस्था असलेली आरएसएस देखील हे सगळं शांतपणे पाहत होती. गेल्या १० वर्षांमध्ये आम्हाला आरएसएसकडून खूप अपेक्षा होत्या. आम्हाला वाटत होतं की सरसंघचालक आणि संघाचे इतर लोक निर्भयतेने पुढे येतील, सूडभावनेने चालू असलेलं राजकारण थांबवण्याचा प्रयत्न करतील. ही या देशातील जनतेची अपेक्षा होती, त्याचप्रमाणे आम्हा विरोधी पक्षांची देखील अपेक्षा होती. परंतु, तसं झालं नाही.

हे ही वाचा >> “मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

ठाकरे गटातील खासदार म्हणाले, देशावर जेव्हा आणीबाणी लादली होती, तेव्हा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब देवरस यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी हुकूमशाहीचा विरोध केला होता. त्यामुळे त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. हे आम्ही विसरू शकणार नाही. लोकशाही वाचवण्यात आरएसएसचं देखील काही प्रमाणात योगदान आहे. संघाचे लोकही तुरुंगात गेले आहेत. परंतु. गेल्या १० वर्षांत आम्ही याच्या विपरीत गोष्टी पाहिल्या. दुसऱ्या बाजूला भाजपाचा अहंकार कोणी थांबवला असेल तर तो येथील जनतेने थांबवला. मात्र आता आम्हाला संघाकडून काही अपेक्षा आहेत. संघाने आता ज्या भूमिका घेतल्या आहेत, त्याच भूमिका कायम राहणार असतील, त्यांचा रोख असाच राहणार असेल तर सत्तेवर जो अहंकाराचा शिरोमणी बसला आहे त्याला सत्तेतून दूर करण्याचा संघाकडून प्रयत्न होईल अशी आम्हाला आशा आहे. आम्हाला विश्वास आहे की संघ हे नक्कीच करू शकतो.