आगामी लोकसभा निवडणूक आता एक वर्षावर येऊन ठेपली आहे. विविध राजकीय पक्षांनी आता लोकसभेची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष सातत्याने लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावर चर्चा करत असल्याच्या बातम्या अधून मधून समोर येत आहेत. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने महाराष्ट्रात लोकसभेच्या १८ जागा जिंकल्या होत्या. परंतु पक्ष फुटल्यानंतर आता शिवसेनेचे पाच खासदार ठाकरे गटाकडे आहेत. तर १३ खासदार शिंदे गटात आहेत. तसेच दादरा आणि नगर हवेलीतल्या खासदार शिवसेनेशी संलग्न आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्रात १८ आणि दादरा आणि नगर हवेली मिळून १९ खासदार निवडून आणू असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जात आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही १९ जागांच्या भूमिकेवर ठाम आहोत. मान्य आहे आमचे लोक सोडून गेले. परंतु सध्याच्या लोकसभेत आमचे १९ खासदार आहेत. महाराष्ट्रात विजयी झालेले १८ आणि एक दादरा नगर हवेलीतील एक असे मिळून आमचे १९ खासदार आहेत. प्रत्येक पक्षाचा एक विजयी आकडा असतो. तो आकडा कायम ठेवण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो. आम्ही पुन्हा १९ खासदार पुन्हा निवडून आणू ही भूमिका एखाद्या पक्षाने घेतली तर त्यात काय चुकलं?
हे ही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच्या गाठीभेटी वाढण्याचं कारण काय? प्रकाश आंबेडकर म्हणाले…
संजय राऊत म्हणाले, आमचे खासदार सोडून गेले असतील. परंतु त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे आमदारांप्रमाणे तेही अपात्र ठरतील. आमचे खासदार सोडून गेले असले तरी आमचे मतदार जागेवर आहेत. मतदारांनी शिवसेनेला मतदान केलं आहे. आमचे मतदार त्या त्या मतदारसंघात आहेत, हे कसं विसरता येईल. त्यामुळे १९ खासदार परत निवडून आणू या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.