शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सातत्याने राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. कल्याणमधील भाजपा आमदाराने पोलीस ठाण्यात घुसून शिंदे गटाच्या नेत्यावर केलेला गोळीबार, तसेच कुख्यात गुंडांच्या वर्षा बंगल्यावरील कथित भेटीगाठींवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. अशातच संजय राऊत यांनी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार संतोष बांगर यांचा कथित फोटो एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निलेश घायवळला दोन वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्या अटकेची बातमीदेखील राऊत यांनी शेअर केली आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, महाराष्ट्रात गुंडा राज… गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे हे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. मोदी-शाहांच्या या राज्यकर्त्या टोळीने पुण्याची ही काय अवस्था करुन ठेवली आहे?

दरम्यान, संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी राऊत म्हणाले, मी दररोज या सरकारच्या गुंडगिरीसंदर्भातली माहिती देत राहणार आहे. मी एक्सवरील त्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करून त्यांनादेखील या गुंडगिरीची माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री गुंडांच्या टोळ्यांना भेटत आहेत. गुंडांच्या टोळ्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर, शासकीय निवासस्थानी आणि थेट मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. खून, दरोडे, बलात्काराच्या प्रकरणांमधील जामीनावर सुटलेले किंवा बाहेर काढलेल्या गुंडांच्या टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत. मुख्यमंत्री राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या गुंडांच्या टोळ्यांचा वापर करणार आहेत? की आगामी निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे? या गुंडांचा वापर करून मुख्यमंत्री लोकशाहीचा मुडदा पाडणार आहेत का? असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

हे ही वाचा >> “राज्यातल्या मिंध्या आमदारांनी या आदिवासी आमदारांच्या पायांचे…”, सत्ताधाऱ्यांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल!

संजय राऊत म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात, मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या वाढदिवसाला गुंडांची रांग लागते. कल्याणमध्ये आमदार गोळीबार करतात, हे सगळं काय चाललंय. राज्यातल्या गुंडगिरीबाबत मी काल एक पोस्ट शेअर केली होती, आज एक केली आहे, उद्याही एक करेन. मी दररोज यासंदर्भातली माहिती शेअर करेन. मुख्यमंत्री, त्यांचा मुलगा, अजित पवारांचा मुलगा गुंडांना भेटून कसली चर्चा करत आहेत?

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut share eknath shinde photo with gangster nilesh ghaiwal criticize ajit pawar son asc
Show comments