भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सहकुटुंब मकाऊ येथे सुट्टीवर गेले असताना कॅसिनो खेळत असल्याचे छायाचित्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. परंतु, यावरून आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा यावरून भाजपावर पलटवार केला आहे. त्यांनी पुन्हा तोच फोटो एक्सवर पोस्ट करत भाजपावर टीका केली आहे.
एक्स पोस्टवर संजय राऊत म्हणाले की, मी माझ्या ट्वीटमध्ये कोणाचं नाव घेतलं होतं का? किंवा कोणावर आरोप केले होते का? नाही! मी फक्त एवढंच म्हटलं होतं की महाराष्ट्र जळत असताना काहीजण मकाऊमध्ये व्यस्त आहेत.
“प्रदेशाध्यक्षांचं नाव जाहीर करून भाजपावालेच हिट विकेट झाले. आ बैल मुझे मार, असं म्हणतात याला हिंदी भाषेत”, असंही संजय राऊत म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
‘महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथील कॅसिनोत जुगार खेळत आहेत’ अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली होती. याबरोबरच बावनकुळे कॅसिनोमध्ये बसले असल्याचे छायाचित्र जोडले. कॅसिनोमधील जुगारात बावनकुळे यांनी साधारण साडे तीन कोटी उडविल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय खेळले तर बिघडले कोठे, असेही ट्वीट राऊत यांनी केले होते.
हेही वाचा >> “महाराष्ट्र पेटलाय अन् हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत…”, बावनकुळेंचा ‘तो’ फोटो ट्वीट करत राऊतांचा हल्लाबोल
‘मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या तळ मजल्यावर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे”, असा खुलासा बावनकुळे यांनी केला.
राऊत आणि बावनकुळे यांच्यातील वाद सुरू होताच प्रदेश भाजपाच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे पार्टीतील छायाचित्र ट्वीट करण्यात आले. त्यात आदित्य ठाकरे यांच्या कपात कोणत्या ब्रॅण्डची व्हिस्की आहे, असा सवाल संजय राऊत यांना उद्देशून करण्यात आला. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे जुने छायाचित्र ट्वीट केले. त्यावर चित्रा वाघ यांच्या छायाचित्रात मागे उंची मद्याच्या बाटल्या दिसत असल्याने घेतली का? अशी विचारणा करणारे ट्वीट काही जणांनी केले.