राज्यसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातलं राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपामधील चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूंनी ताकद पणाला लावली जाण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजपाला खोचक शब्दांत सल्ला दिला आहे. तसेच, सहाव्या जागेसाठी भाजपाकडून अपक्ष आमदारांवर दबाव आणला जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दबाव?

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ज्यांचं मतदान महत्त्वाचं ठरणार आहे, अशा अपक्ष आमदारांवर भाजपाकडून ईडी-सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचं संजय राऊत म्हणाले. “महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. त्यासाठी भाजपा अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांना आमिषं दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार. ज्यांच्यावर दबाव आणले जात आहेत, ते आमचे मित्र आहेत. तेही आम्हाला हे सांगत आहेत. ईडी, काही जुनी प्रकरणं उकरून काढून त्रास देण्याच्या भूमिका आहेत”, असं राऊत म्हणाले.

झुंडशाहीच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थाच मोडून काढण्याचा डाव – अजित पवार

“यातून भाजपाचं चरित्र उघड होतंय”

अपक्ष आमदारांवर टाकल्या जाणाऱ्या दबावातून भाजपाचं चरित्र उघड होत असल्याचं राऊत म्हणाले. “यातून भाजपाचं चरित्र उघड होतंय. महाराष्ट्रात या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात असतील, तर राज्याची जनता डोळसपणे पाहात आहे. चारही जागा महाविकास आघाडी व्यवस्थित जिंकणार आहे. उगीच भाजपाने त्यांचे पैसे वाया घालवू नयेत. एखाद्या सामाजिक कार्यात लावावेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समर्थ नेतृत्व आहेत. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. अशा निवडणुकांचा सर्वात जास्त अनुभव आम्हाला आहे. पण आमच्या हातात ईडी, सीबीआय नाही. पण इतर अनेक गोष्टी आमच्या हातात आहेत हे लक्षात घ्या”, असं ते म्हणाले.

Maharashtra News Live : झुंडशाहीवर काय म्हणाले अजित पवार?; जाणून घ्या क्षणोक्षणीचे अपडेट्स एकाच क्लिकवर

“…ते १० तारखेला कळेल”

दरम्यान, कोणते अपक्ष आमदार कुणाच्या बाजूने आहेत, हे निवडणुकीच्या दिवशी कळेल, असं राऊत म्हणाले. “कोण कुणाबरोबर आहे, हे १० तारखेला कळेल. बहुजन विकास आघाडी, एमआयएम कुठे आहे, बच्चू कडू कुठे आहेत, शेतकरी संघटना कुठे आहेत हे १० जूनला कळेल”, असं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut shivsena slams bjp on rajyasabha election ed cbi pressure pmw
Show comments