उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेलाही त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांनी रविवारी अहमदनगरमधील छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी केलेल्या राजकीय वक्तव्याला संजय राऊतांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमात बोलताना कुस्तीतील डोपिंग प्रकरणाची उपमा राजकीय घडामोडींना दिली होती. ज्याप्रकारे कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काहीजण नशा करून कुस्ती खेळायला लागले, तसेच राजकारणातही काहीजण सकाळी ९ वाजता नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पहिलवानांना कुस्तीमधून बादच व्हावे लागते, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केलं होतं. त्यावर आता संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे.

संजय राऊत म्हणतात, “तुम्हीही नशा करा”

“तुम्हाला पराभूत करण्याची नशा आहे. तुम्हीही नशा करा. आम्ही नशा करतो तो शुद्ध नशा आहे. तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलताय. तुमचं द्वेषाचं, सूडाचं राजकारण आहे. ती भांग अत्यंत वाईट”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“एकत्र लढण्याची फक्त इच्छा…”, शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांच्या बोलण्यावरून…!”

“मला त्यावर जास्त बोलायला लावू नका, नाहीतर तुमच्या आसपास नशेबाज लोक कोण आहेत ते मला बोलावं लागेल. तुम्हाला आमची भीती वाटते हे तुम्ही स्पष्ट सांगा. तुम्हाला महाविकास आघाडी, उद्धव ठाकरेंच्या सभांची, संजय राऊत बोलतात त्याची जी भीती वाटते, त्यातून तुम्ही अशी वक्तव्य करत आहात”, असंही राऊत म्हणाले.

ट्वीट मोहित कम्बोज यांचं, टीकास्र फडणवीसांवर!

दरम्यान, यावेळी मोहित कम्बोज यांच्या एका ट्विटवरूनही संजय राऊतांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे गेल्या ९ महिन्यांत लपून-छपून देवेंद्र फडणवीसांना भेटले, अशा आशयाचा दावा मोहित कम्बोज यांनी एका ट्वीटमधून केला होता. त्यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. “आम्हाला चोरून भेटण्याची गरज नाही. ते हुडी घालून चोरून कसे भेटत होते हे देवेंद्र फडणवीसांच्या घरातूनच सांगितलंय. कशाला आम्हाला तोंड उघडायला लावता? आम्ही उघडपणे जाऊ, उघडपणे भेटू. पण भाजपाबरोबर कोणतीही चर्चा सुरू नव्हती आणि नाही”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut shivsena slams devendra fadnavis mohit kamboj tweet pmw
Show comments