भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर स्थानिक शिवसेना नेत्याला मारहाण करण्याचा आणि त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंचा ठावठिकाणा सांगायला मी मूर्ख वाटलो का? असा सवाल पत्रकार परिषदेत करणाऱ्या नारायण राणेंना देखील पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. मात्र, त्यावरून आता राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री असून त्यांना नोटीस कशी पाठवण्यात आली? असा सवाल उपस्थित केला जात असताना त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी परखड मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना नितेश राणेंचा शोध पोलिसांना लागत नसल्याचं पत्रकारांनी विचारताच संजय राऊतांनी गंभीर दावा केला आहे.

“केंद्रीय मंत्र्यांचं विधान कायद्याचं उल्लंघन”

नारायण राणेंनी केलेलं विधान कायद्याचं उल्लंघन असल्याचं राऊत यावेळी म्हणाले. “काल केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद आम्ही पाहात होतो, तेव्हा पोलिसांना हवा असलेला एक संशयित आरोपी, तो कुणीही असेल, पोलीस त्यांना हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याच्या तपासात शोधत आहेत. पण केंद्रीय मंत्री म्हणतायत की ते कुठे आहेत हे मी सांगणार नाही. हे कायद्याचं उल्लंघन आहे. आपण देशाचे केंद्रीय मंत्री आहात, राज्याचे मुखयमंत्री होता.. कायद्याला सहकार्य करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“..तर तुमच्यावरही गुन्हा दाखल होईल”

“पोलिसांपासून महत्त्वाची माहिती लपवली जाऊ नये, पोलिसांना एखादी व्यक्ती गुन्ह्यासंदर्भात हवी असेल, तो आपला पुत्र असेल, मित्र असेल, त्याची माहिती पोलिसांना देणं गरजेचं आहे. गुन्हेगारांना पाठिशी घालण्यासंदर्भात तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो”, असं राऊत म्हणाले.

आक्षेप घेणाऱ्यांना राऊतांचं प्रत्युत्तर

दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांना नोटीस पाठवण्याबाबत आक्षेप घेणाऱ्यांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. “नोटीस कुणाला पाठवायची हे महाराष्ट्र सरकारच्या कायदा विभागाला कळतं. कायद्याचं पालन, कायद्याची अंमलबजावणी याबाबत महाराष्ट्र सरकारला कुणीही अतिशहाणपणा शिकवू नये. या राज्यात कायदा-सुव्यवस्था उत्तम आहे. राज्याचं कायदा खातं उत्तम प्रकारे काम करतंय. अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना तुम्ही, तुमच्या केंद्र सरकराने जेलमध्ये घालवलंय. त्याही प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. आम्ही प्रतिष्ठित नाही का?” असा सवाल संजय राऊतांनी केलाय.

नितेश राणे प्रकरणात आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस; राऊतांनी लगावला टोला

संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे?

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या सूचक विधानावरून चर्चा सुरू झाली आहे. नितेश राणे पोलिसांना सापडत नसल्याचं पत्रकारांनी विचारताच राऊत म्हणाले, “एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कुणाला दुसऱ्या राज्यात लपवून ठेवलं असेल, तर तो गुन्हेगार कसा सापडणार? पण पोलीस शोधतील. राज्याच्या पोलिसांना हे सांगायला नको. कुठलाही गुन्हेगार पाताळात जरी लपला असेल, तर महाराष्ट्राचे पोलीस शोधून आणतील”, असं राऊत म्हणाले.

“…पण आम्ही सहन करतोय”

ही कारवाई राजकीय सूडापोटी होत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र, त्यावर देखील संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राजकीय सूडापोटी आमच्यावर कारवाया झाल्या, त्यातला मी एक व्हिक्टिम आहे. राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आणि महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांच्या सूचनेवरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील प्रमुख लोकांवर, त्यांच्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला त्रास दिला जातोय हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण आम्ही सहन करतोय”, असं राऊत म्हणाले.

Story img Loader