नागालँडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये स्थानिक एनडीपीपी-भाजपा आघाडीला बहुमत मिळालं आहे. या आघाडीला ३७ जागा मिळाल्या आहेत. तर ७ जागांसह तिसऱ्या स्थानी असणाऱ्या राष्ट्रवादीनं विजयी आघाडीला पाठिंबा दिला आहे. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. राष्ट्रवादीनं भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यावर शरद पवारांनी भूमिका मांडल्यानंतर त्यावर आज मित्रपक्ष ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊतांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
काय घडलं नागालँडमध्ये?
विधानसभा निवडणुकांमद्ये एनडीपीपी हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला, तर भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या दोघांची आघाडी असताना राष्ट्रवादी काँग्रेसला तिथे सात जागा जिंकण्यात यश आलं आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसनं एनडीपीपी-भाजपा आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यावर “निवडणुकांपूर्वीच आमचा नागालँडमध्ये मुख्यमंत्र्यांना पाठिंबा होता. त्यामुळे आम्ही भाजपाशी युती केलेली नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यासंदर्भात आता संजय राऊतांनी मीडियाशी बोलताना भूमिका मांडली आहे.
“तिथे भाजपानं सत्ता स्थापन केलेली नाही. तिथल्या प्रादेशिक पक्षाचे नेते रिओ, जे आमच्याबरोबर संसदेत काही काळ खासदारही होते, त्यांच्या पक्षाला २५ ते २६ जागा मिळाल्या आहेत. त्यांचा मुख्य पक्ष आहे. नागालँड हे सीमेवरचं राज्य आहे. संवेदनशील आहे. ते काश्मीरपेक्षा जास्त संवेदनशील राज्य आहे. तिथेही दहशतवाद, इतर कारवायांचा धोका असतो. रिओ यांच्या पक्षाबरोबर भाजपाची युती होती. भाजपाला १० ते १२ जागा मिळाल्या आहेत. इतर अनेक लहान पक्ष आहेत. त्या सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार बनवलंय”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला पाठिंबा? शरद पवारांनी मांडली भूमिका, म्हणाले…
“राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडतोय”
“नागालँडमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच झालाय असं नाही. याआधीही नागालँडमध्ये अशा प्रकारचं एकत्रित सरकार बनवण्याचा प्रयोग झालाय. कारण ती त्या राज्याची गरज आहे. ज्याप्रकारच्या घडामोडी त्या राज्यात आणि सीमेवर घडत असतात, त्यामुळे तिथे राजकीय संघर्ष असू नये, विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं टाकता यावीत, यासाठी अशा प्रकारचे निर्णय नागालँडच्या बाबतीत घेतले जातात. अर्थात, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस थोडा कमी पडतोय”, असंही संजय राऊत म्हणाले.
नागालँडमधील घडामोडींवर आज मविआची बैठक
“नागालँडची भौगोलिक आणि सुरक्षाविषयक परिस्थिती अनेकदा काश्मीरपेक्षा अत्यंत गंभीर असते. तिथल्या मुख्य पक्षाचं सरकार आहे, सरकार भाजपाचं नाही. भाजपा त्यांच्यासह सरकारमध्ये इतर पक्षांसमवेत सामील झाला आहे. पण हरकत नाही, आज महाविकास आघाडीची यासंदर्भात चर्चा आहे. त्यावेळी हा विषय चर्चेत येईल”, असंही संजय राऊतंनी नमूद केलं.