गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षपदाच्या प्रश्नावर अजूनही उत्तर मिळालेलं नाही. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपद घेतलं. मात्र, अजूनही पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे त्यावरून बरीच चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. काँग्रेसमधील जी-२३ गटाकडून देखील याच प्रकारची मागणी करण्यात येत असताना आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी काँग्रेसला या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सल्ला दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाविषयी आपली भूमिका देखील स्पष्ट केली.
काँग्रेसला अध्यक्ष हवा की नको…
“काँग्रेसला अध्यक्ष हवा की नको हा काँग्रेसचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. मात्र, काँग्रेस पक्ष देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे. काँग्रेसनं स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान दिलं आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त काळ देशावर राज्य केलं आहे. अनेक मोठे नेते दिले आहेत. अशा वेळी काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणं याविषयी लोकांच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण होतो. आज राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी आहेत. तरीही काँग्रेसला अध्यक्ष नाही. जर कुणी तशी मागणी केली तर ती मागणी योग्य असेल की काँग्रेसचा अध्यक्ष कुठे आहे?” असं राऊत म्हणाले.
काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याचं चित्र
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेसची अवस्था हेडलेस अर्थात नेतृत्वहीन झाल्याचं म्हटलं आहे. “जोपर्यंत काँग्रेस पक्षाला एक अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत आज जो काही गोंधळ सुरू आहे, तो थांबणार नाही. राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याचं चित्र दिसतंय. याचा फायदा भाजपासारखे पक्ष घेत आहेत. काँग्रेस देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि तो राहील. भविष्यात राजकारण करताना काँग्रेसशिवाय राजकारण करता येणार नाही. अशा वेळी काँग्रेस नेतृत्वानं अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला, तर नक्कीच देशाला विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल”, असं राऊत यावेळी म्हणाले.
..तर काँग्रेसला गती मिळेल!
“वर्किंग कमिटी असे निर्णय घेत असते. काँग्रेसचं नेतृत्व म्हणजे गांधी परिवारच आहे. तरीही अध्यक्ष हवा. शिवसेना पक्षप्रमुख आमचे प्रमुख आहेत. आम्ही सगळेच काम करतो. पण नेते ते आहेत. त्या पदावर जो बसतो, तो पक्षाला दिशा देत असतो. असं कुणी असेल, तर त्यांच्या पक्षाला अजून गती मिळेल. भाजपा असो, काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा इतर कोणता पक्ष असो. पक्षाचा मुख्य सेनापती असायलाच हवा”, असंही राऊत म्हणाले.
“आज इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते, तर…”, पंजाबमधील परिस्थितीवर शिवसेनेची भूमिका!
“…यावर पळवापळवीचे माप ठरते”
आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देखील काँग्रेस नेतृत्वाविषयी भूमिका मांडण्यात आली आहे. इतर पक्षांमधील नेतेमंडळी, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याच्या वृत्तीवर देखील सामनाच्या अग्रलेखात बोट ठेवलं आहे. “नाराजी सर्वच पक्षांत असते, फक्त वरचे नेतृत्व किती प्रबळ आहे, यावर पळवापळवीचे माप ठरलेले असते. इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते, तर कॅ. अमरिंदर सिंग यांची असे काही करण्याची हिंमत झालीच नसती”, अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.