उद्धव ठाकरे हे देशाच्या राजकारणातले हिरो आहेत, असं म्हणत वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्र ज्यांच्याकडे अपेक्षेने पाहतो आहे ते आदित्य ठाकरे आहेत असंही संजय राऊत म्हणाले. आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी खास भाषण केलं. आजचा दिवस ऐतिहासिक आहे असंही संजय राऊत म्हणाले. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या संघर्षाची आठवण आणि स्मरण करुन देणारा हा दिवस आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक

१९ जून १९६६ ला आजच्या दिवसाला जे महत्व आहे, तेच आजच्या दिवसाला आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे शिवसेनेने भरारी घेतली आहे. या विजयाचं नेतृत्व आज उद्धव ठाकरे करत आहेत. आपण आज विजेत्यांचा आणि लढवय्यांचा सत्कार केला. आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांबरोबर झुकणार नाही हे मोदी शाह यांना उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं. आज त्यांच्याकडे संपूर्ण देश अपेक्षेने पाहतो आहे. मोदी शाह यांचा पराभव अशक्य आहे, मोदी ४०० पार येणार हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे असं वातावरण होतं. जन्माला येतानाच ते ४०० खुळखुळे घेऊन आले असंच चाललं होतं. मात्र मोदींचा आणि भाजपाचा खुळखुळा करुन दाखवला तो उद्धव ठाकरेंनी. असं संजय राऊत म्हणाले.

“भगवं उपरणं घातलं म्हणजे…?”, संजय शिरसाटांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “असे अनेक पात्र…”

आम्ही हलाहल पचवलं आहे हे विसरु नका

मोदी-शाह शिवसेना संपवायला निघाले होते. भगवान शंकराने जसं हलाहल पचवलं तशाच प्रकारे शिवसेना उभी राहिली आहे. कितीही रेडे कापा आम्हाला फरक पडत नाही. आज डोम सभागृहात डोमकावळ्यांचं संमेलन सुरु आहे. आपला उद्या हिरक महोत्सव होईल. त्यांनी कशीबशी अडीच वर्षे पूर्ण केली आहेत. बाळासाहेब ठाकरेंना वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही. संघर्षातून आणि विचारांमधून ही शिवसेना उभी केली आहे. गुजरातचे हौशे, नवशे गवशे आले तरीही वार करुन ते शिवसेना संपवू शकत नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी ब्रांड नव्हे, ब्रँडी

छत्रपतींनी जशी आपली मान दिल्लीपुढे झुकवली नाही. त्याच महाराजांचा वारसा उद्धव ठाकरेंनी चालवला. मला आश्चर्य वाटतंय भाजपा आता धन्यवाद यात्रा काढणार आहे. कशासाठी? महाराष्ट्राने पराभव केल्याबद्दल. मोदींना बहुमक्त केल्याबद्दल? मला वाटतं त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मोदी ब्रांड होता आता मोदी ही ब्रँडी झाली त्यामुळे भाजपावाले नशेत आहेत. आता ब्रँडीचे दोन दोन घोट हे मारत आहेत. त्यानंतर आभारयात्रा काढत आहेत. महाराष्ट्राने झिडकारलं, नाकारलं लाथाडलं आहे.

जिथे मंदिर बांधलं तिथे रामाने मोदींना लाथाडलं

उत्तर प्रदेशातल्या अयोध्येत रामाचं मंदिर उभारलं. त्यात रामाचा फोटो एवढासा. त्या मंदिरातही मोदीच दिसत होते. आता रामाने लाथ घातल्यावर मोदींना राम दिसला असेल. मोदींच्या हिंदुत्वाचा देशाने पराभव केला. कारण त्यांचं नकली आणि ढोंगी हिंदुत्व आहे. जे महाराष्ट्राने आणि देशानं नाकारलं. समोरच्यांना सत्ता लागला आहे. पण पुढे त्यांना हे यश मिळणार नाही. कसला स्ट्राईक रेट? तुमच्या गद्दारीचा आणि बेईमानीचा स्ट्राईक रेट वाढला आहे. सातपैकी अमोल कीर्तिकरांची जागाही आपलीच आहे. भाजपाने ११० जागा ५०० ते १ हजार जागांनी जिंकल्या आहेत. त्या विजय चोरलाच म्हणावं लागेल. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. पाच फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर होते वाराणसीत. जिथे जिथे हिंदुत्व, मंदिरं तिथे पराभव झाला आहे. असंही संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams bjp and narendra modi on loksabha election seats he said uddhav thackeray shows his power scj