गेल्या काही दिवसांपासून देशभरात नॅशनल हेराल्ड प्रकरण चांगलंच गाजतंय. याला कारणीभूत ठरली ती सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीनं बजावलेली नोटीस. ८ जून आणि १३ जून या दिवशी अनुक्रमे या दोघांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहाण्याचे समन्स धाडले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर दबाव आणला जात असल्याची टीका काँग्रेसस अनेक विरोधी पक्षांनी केली आहे. त्यात शिवसेनेचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा आढावा घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात ईडी आणि त्याअनुषंगाने केंद्र सराकारवर टीका केली आहे.
“हेराल्ड हे स्वातंत्र्यलढ्यासाठीचं मिशन होतं”
गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवलेलं नॅशनल हेराल्ड हे स्वातंत्र्यलढ्याचं मिशन होतं, असं संजय राऊत या लेखात म्हणाले आहेत. “नेहरुंच्या या वृत्तपत्राचा इंग्रजांनी इतका धसका घेतला होता, की १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळी नॅशनल हेराल्डवर बंदी घातली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी या वृत्तपत्राची निर्मिती झाली. लढणाऱ्यांसाठी ते हत्यार होते. अर्थार्जनासाठी सुरू केलेला तो व्यवसाय नव्हता”, असं संजय राऊतांनी यात नमूद केलं आहे.
“…तरी ईडीनं तिथे प्रवेश केला”
या लेखात राऊतांनी हे प्रकरण नेमकं काय आहे, त्याविषयी भाष्य केलं आहे. “१ एप्रिल २००८ रोजी हे वृत्तपत्र बंद करण्यात आलं. त्याची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडे होती. या कंपनीवर ९० कोटींहून जास्त कर्ज होतं. हे कर्ज फेडण्यासाठी यंग इंडिया लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली. त्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधींची ३८-३८ टक्के भागीदारी होती. एजीएलचे ९ कोटी शेअर्स या कंपनीला १० रुपये भावाने विकण्यात आले. १९३८ साली या शेअर्सचा भाव १० रुपये होता. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामींचा आरोप आहे की कोणताही व्यवसाय नसताना ही कंपनी ५० लाखांच्या बदल्यात २ हजार कोटींची मालक बनली. पण या संपूर्ण व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार कुठेच झाला नाही. गुन्हेगारी व्यवहाराला पैसा वापरला असे दिसत नाही. तरी ईडीनं तिथे प्रवेश केला”, असं लेखात नमूद केलं आहे.
“ईडी-सीबीआयद्वारे भाजपाकडून अपक्षांवर दबाव”, राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
“..पण नेहरूंचा हेराल्ड गुन्हेगार ठरला”
“नेहरूंची ही संस्था टिकावी म्हणून काँग्रेसनं काही उलाढाली केल्या असतील. अशा उलाढाली संघ परिवारातील अनेक संस्था करतात. पीएम केअर फंडापासून भाजपाच्या खजिन्यात जमा होणाऱ्या शेकडो कोटींच्या रकमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेच आहे. पण नेहरूंचा हेराल्ड गुन्हेगार ठरला! नेहरूंना ईडी, सीबीआयची नोटीस पोहोचवल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल! या प्रकरणात नेहरूंनाच नोटीस बजावून त्यांच्या स्मारकावर ती चिकटवली तरी आश्चर्य वाटायला नको”, अशा शब्दांत राऊतांनी खोचक टोला लगावला आहे.