महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे (२३ फेब्रुवारी) तीनच्या सुमारास वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला असून ते मुंबईत येणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना संजय राऊत यांनी सांगितले, “आमच्यावर रामजन्मभूमी आंदोलनाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसाठी मनोहर जोशी हे उत्तर होते. ते स्वतः त्यावेळी अयोध्येत कारसेवेसाठी उपस्थित होते.”
काय म्हणाले संजय राऊत?
बुलढाणा येथे माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी मनोहर जोशींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “मनोहर जोशींना आम्ही सर म्हणून संबोधायचो. तर बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत म्हणायचे. शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि महाराष्ट्र व मराठी माणसासाठी एक आदर्श असे ते व्यक्तिमत्व होते. उद्धव ठाकरे आणि मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना आम्हाला ही दुःखद बातमी समजली. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या प्रत्येक आंदोलनात मनोहर जोशी आघाडीवर होते. मुंबईमध्ये सीमाप्रश्नावर आंदोलन झाले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली. तेव्हा त्यांच्याबरोबर मनोहर जोशी होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून राहिले. त्यांनी नगरसेवक पदापासून ते मुंबईचे महापौर, विधानपरिषद आणि विधानसभेतील आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे मुख्यमंत्री, लोकसभेत गेल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्षपद अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा हा प्रवास झाला. त्यामुळे ते शेवटपर्यंत शिवसेनेचे ऋणी राहिले.”
पक्षपात न करता संसद चालवून दाखविली
उत्तम वाचक, कडवट मराठी अभिमानी आणि यशस्वी उद्योजक असे गुण त्यांच्यात होते. मराठी माणसाने उद्योग कसा यशस्वी करून दाखवावा, याचे उदाहरण त्यांनी घालून दिले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम, हे आदर्शवत होते. जोशी शिक्षक असल्यामुळे त्यांनी संसदेचे कामही शिस्तीनुसार चालविले. त्यांना सर्व खासदार हेडमास्तर म्हणायचे. पक्षपात न करता संसद कशी चालवावी, हे त्यावेळी त्यांनी दाखवून दिले, असेही संजय राऊत म्हणाले.
ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री पद दिले म्हणून त्यावेळी शिवसेनेवर टीका झाली. पण बाळासाहेबांनी कधीही कुणाची जात पाहून पद दिले नाही. कर्तबागारी आणि कर्तुत्व पाहूनच पद दिले. मनोहर जोशींनीही मुख्यमंत्री म्हणून आपले कर्तव्य पार पाडले. बाळासाहेबांची विकासासंबंधी जे स्वप्न होते, ते त्यांनी पूर्ण केले. कश्मीरी पंडितांवर जेव्हा काश्मीरमध्ये अत्याचार होत होते, तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या जोशींना काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देऊ केले होते, असे करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य होते.