महाराष्ट्रात सध्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेनेत फूट पडून आता जवळपास दीड वर्षाचा काळ लोटला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन महिने उलटले आहेत. शिवसेनेतील आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मे महिन्यात निर्देश दिले. मात्र, अजूनही त्यावर विधानसभा अध्यक्षांसमोर सविस्तर सुनावणी सुरू झालेली नाही. यावरून न्यायालयानं फटकारल्यानंतर अध्यक्षांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीतील फुटीसंदर्भातही प्रकरण चर्चेत असून यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटानं पक्षनाव व पक्षचिन्हावर दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधीच अजित पवार गटाकडून पक्षनाव व चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी तशी भूमिका मांडल्यानंतर त्यावर सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोग तटस्थपणे निर्णय देणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यावरून संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊतांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली. “या अनुभवातून शिवसेना गेली आहे. अजूनही जातेय. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपा व दिल्लीतील राज्यकर्ते खेळ करत आहेत. सर्व घटनात्मक पदावरील व्यक्तींचा ताबा घ्यायचा आणि आपल्याला हवे ते निर्णय घ्यायचे. एक सर्वोच्च न्यायालय सोडलं तर बाकी सगळं त्यांच्या हातात आलं आहे”, असं राऊत म्हणाले.
“आदित्य ठाकरेंनी आमच्या सरकारला ‘सळो की पळो’ केलं नाहीतर…”, भाजपा खासदाराचा टोला
“शिवसेना जेव्हा फुटली, तेव्हा ४० आमदार सोडून गेले या एका भूमिकेवर निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात दिली. हा सरळ सरळ अन्याय आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. ५५ वर्षांनंतर तिची सूत्रं अधिकृतपणे उद्धव ठाकरेंकडे दिली. तेव्हा आजचे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या कार्यकारिणीतही नव्हते. तेव्हा ते ठाण्यातले नगरसेवक होते. मग शिवसेना त्यांची कशी झाली? बाळासाहेब ठाकरेंच्या निधनावेळी एकनाथ शिंदे आमदार असतील. नेते नव्हते. आणि आज अचानक शिवसेना एकनाथ शिंदेंची कशी सांगता? हे कोणतं दुकान आहे?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
“…तर सुप्रिया सुळेंची भीती रास्त”
“जर शिवसेना हे एका गटाला देऊ शकतात, तर सुप्रिया सुळेंची भीती रास्त आहे. इथे काहीही होऊ शकतं. त्या काळात शिंदे गटाचे काही लोक तारखा द्यायचे. निर्णय आमच्याच बाजूने लागणार, चिन्ह आम्हालाच मिळणार हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगत होता? आज काही काळापुरतं फुटलेल्या राष्ट्रवादीच्या गटाला, भाजपाला निवडणूक आयोगाचं सदस्य करून घेतलं असेल. पण संविधान अजून जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालय अजून जिवंत आहे. न्याय मेलेला नाही”, अशी आशा यावेळी संजय राऊतांनी व्यक्त केली.
मुंबईतील ‘त्या’ प्रकरणावरून टीका
दरम्यान, मुलुंड वेस्टमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारण्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून मुंबईतील मराठी माणसाच्या स्थितीसाठी एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचं राऊत म्हणाले आहेत. “मराठी माणसाच्या या स्थितीसाठी एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. म्हणूनच तर शिवसेना तोडली. जेणेकरून मुंबईतील मराठी माणसाचा आवाज संपवता येईल. त्यासाठीच भाजपाने शिवसेना तोडली. पण आम्ही या सगळ्या गोष्टी बघत आहोत. येत्या दिवसांमध्ये काय होतं ते तुम्ही पाहाल”, असं राऊत म्हणाले.