गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच चर्चेत आलं होतं. आधी किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संजय राऊतांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेऊन उलट किरीट सोमय्यांवरच आरोप केले. या सगळ्या प्रकारामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं होतं. आता या सगळ्याचा पुढचा अंक सुरू झाला असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालय गाठलं आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाकडे गैरव्यवहारांचे पुरावे सादर केले असून त्यासंदर्भात लवकरच मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तपास यंत्रणांना फक्त महाराष्ट्रातच काम”

संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाकडे कागदपत्र सोपवल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. “केंद्र सरकारकडून कारवाईची अपेक्षा नाही. कारण केंद्रातल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशांनुसार महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या सूडाच्या कारवाया सुरू आहेत. महाराष्ट्रात जास्त. जणूकाही केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच काम आहे. महाराष्ट्रातच सर्वकाही घडतंय. महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करायचं. खोटी प्रकरणं, खोटे पुरावे उभे करायचे. अशी चिखलफेक सुरू आहे. पण जे चिखल फेकत आहेत, त्यांचे हात देखील किती बरबटलेले आहेत हेसुद्धा देशाला कळायला हवं”, असं राऊत म्हणाले.

..म्हणून थेट पंतप्रधान कार्यालय गाठलं!

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाला पुरावे का सादर केले? याविषयी संजय राऊतांनी खुलासा केला आहे. “यामागे कोणतं सिंडिकेट आहे, त्याबाबतची माहिती मी काल पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केली आहे. हा रेकॉर्ड आहे की आम्ही तुम्हाला कळवलं आहे, पण तुम्ही त्यावर काहीही केलेलं नाही”, असं राऊत म्हणाले.

“भाजपा क्रिमिनल सिंडिकेट चालवतंय”

“महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणा देखील त्यांचं काम करतीलच. पण केंद्रातल्या तपास यंत्रणा काय करत आहेत? भाजपामधल्या दोन-चार लोकांना हाताशी धरून कशा पद्धतीने वेगळं क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत, त्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पोहोचवणं हे शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे. त्याबाबत माहिती मी वेळोवेळी पंतप्रधान कार्यालयाला देत जाईन आणि मुंबईत येऊन पत्रकार परिषद घेत जाईन”, असं देखील ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams bjp on ed cbi it raid in maharashtra submits documents to pmo pmw