मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भावावर अर्थात श्रीधर पाटणकर यांच्यावर आज ईडीनं मोठी कारवाई केली. श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या ठाण्यातील एकूण ११ सदनिका ईडीनं जप्त केल्या आहेत. या कारवाईनंतर राज्यात खळबळ उडाली असून त्यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून “ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सनसनाटीसाठीच ही कारवाई”

ही कारवाई सनसनाटी निर्माण करण्यासाठीच केल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. “ही कारवाई फक्त राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तुम्हाला झुकवू शकतो, नमवू शकतो हे राजकीय विरोधकांना दाखवण्यासाठी जिथे जिथे भाजपाची सत्ता नाही, अशा प्रत्येक राज्यात अशा कारवायांना ऊत आला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीलाही नोटीस आली आहे”, असं राऊत म्हणाले.

“आपण एखाद्या राज्यात निवडणूक हरलो, म्हणून ज्यांनी पराभव केला, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही रक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे. संसदेमध्ये कालच जी माहिती आली, त्यानुसार ईडीच्या सर्वाधिक कारवाया जिथे भाजपाचं सरकार नाही तिथे झाल्या आहेत. यूपीएच्या ११ वर्षांच्या काळात २२ ते २३ कारवाया झाल्या आहेत. मोदींचं सरकार आल्यापासून साधारणपणे २५०० कारवाया झाल्या आहेत. त्यातल्या अनेक कारवाया चुकीच्या असल्याचं नंतर स्पष्ट झालं आहे. केंद्रीय तपास यंत्रणा हुकूमशाही पद्धतीनुसार गुलामासारख्या वागवल्या जात असल्याचं स्पष्ट झालं आहे”, असा आरोप संजय राऊतांनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, ठाण्यातल्या ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील ११ सदनिका जप्त!

“न्यायालयांकडून न्यायाची अपेक्षा नाही”

दरम्यान, सध्याच्या वातावरणात न्यायालयांकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचं विधान राऊतांनी यावेळी केलं आहे. “असं केल्याने इथलं सरकार पडेल आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही झोपेतून जागे व्हा. असं काहीही होणार नाही. आम्ही लढत राहू आणि तुमची सुडाची भावना लोकांसमोर आणू. आम्ही न्यायालयांकडून या वातावरणात न्यायाची अपेक्षा करू शकतो, असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातली जनता ठाकरे सरकारला, आम्हाला सगळ्यांना ओळखते. कधी ना कधी या राजकी कारवाईचं उत्तर सगळ्यांना द्यावं लागेल. याची किंमत चुकवावी लागेल”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams bjp on ed saized shridhar patankar flats nilambari thane pmw