शिवसेना आणि भाजपा यांच्यामधली २५ वर्षांची युती तुटली आणि राज्याच महाविकास आघाडीचं नवं सरकार आलं. मात्र, हे सरकार आल्यापासून या दोन्ही पक्षांमध्ये सुंदोपसुंदी सुरूच आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप अद्याप संपलेले नसून त्यावरून राज्यातल्या राजकारणात चांगलाच कलगीतुरा गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाला. उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरून टीका करणाऱ्या भाजपाला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या २३ जानेवारीच्या भाषणात प्रत्युत्तर दिलं. या भाषणासंदर्भात भूमिका मांडताना शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ‘तो’ संदेश!
उद्धव ठाकरेंनी २३ जानेवारी रोजी केलेल्या भाषणातून भाजपाला एक निश्चित संदेश मिळाल्याचं संजय राऊत म्हणतात. “उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे जोरदार पडसाद उमटत आहेत. भाजपाबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली. त्यांच्या भाषणातून एक संदेश नक्की मिळाला तो म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच राज्याचं भविष्य आहे. भाजपाशी टेबलाखालून व्यवहार आणि बोलणी चालल्याच्या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरेंनी या भाषणात भाजपावर जोरदार हल्ला केला भाजपाच्या ढोंगाचे, नकली हिंदुत्वाचे इतके वाभाडे उद्धव ठाकरेंनी कधीच काढले नव्हते”, असं संजय राऊत यांनी नमूद केलं आहे.
“शेवटी कोण कुणाचा बाप?”
“उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार मुद्दे मांडले. शेवटी कोण श्रेष्ठ? कोण कुणाचा बाप? हाच लढाईचा बिंदू ठरत आहे. भाजपाच्या मगतीशिवाय शिवसेनेची वाढ शक्यच नसल्याचं मत फडणवीसांनी व्यक्त केलं. ही अतिशयोक्तीच म्हणायला हवी. शिवसेनेचा जन्म १९६६ सालातला. भाजपानं १९८० साली डोळे उघडले. त्यामुळे भाजपाच्या मदतीने शिवसेना उभी राहिली आणि वाढली हा दावा चुकीचा आहे. कोण कुणाच्या आधी जन्माला आले यापेक्षा जन्मास येऊन काय दिवे लावले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे”, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.
“संजय राऊत शपथ देत नाहीत मुख्यमंत्र्यांना, ती राज्यपालांनाच द्यावी लागते”
मग सीबीआयने बाळासाहेबांना आरोपी का केले?
दरम्यान, बाबरी मशीद पाडल्यानंतर भारतात शिवसेनेची लाट वगैरे नव्हती या फडणवीसांच्या दाव्यावर देखील राऊतांनी निशाणा साधला. “शिवसेनेने १८० जागा लढवल्या त्यात सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाले असं फडणवीस म्हणाले. पण शिवसेनेनं कुठेही अधिकृत उमेदवार उभे केले नव्हते. त्यांना पक्षाचे चिन्ह नव्हते. शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचारास गेले नाहीत. बाबरी प्रकरणात शिवसेना नव्हती, तर मग सीबीआय विशेष न्यायालयाने बाळासाहेब ठाकरेंना आरोपी का केले?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.