Sanjay Raut महाराष्ट्रात सध्या औरंगजेब हा विषय चर्चेत आहे. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली जाते आहे. हिंदुत्ववादी संघटना त्यासाठी आक्रमक झाल्या आहेत. तसंच उदयनराजे भोसलेंनीही ही मागणी केली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या त्यांच्या सदरात भाजपावर टीका केली आहे. तसंच लालकृष्ण आडवाणींची अवस्था पाहून शहाजहान ची आठवण येत असल्याचंही म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे. ही कबर उखडण्याची मागणी होते आहे. मात्र ज्याने या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंसाचार आहे तो तैमूरलंग त्याच्या नावावरु एक फिल्मस्टार मुलाचं नाव तैमूर ठेवतो त्याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. तैमूर तुम्हाला चालतो आहे. लालकृष्ण आडवाणी यांची अवस्था शहाजहान सारखीच झाली आहे. आडवाणी हे हिंदुत्ववाद, राम मंदिर या सगळ्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी हिंदुत्वाचं शिल्प उभं केलं पण त्यांना शहाजहान प्रमाणे एकांतवासात ठेवण्यात आलं आहे. हे पण या हिंदुत्ववाद्यांचा चालतं आहे. आमचे आडवाणी कुठे आहेत? त्यांना बंदिस्त का ठेवलं आहे? असे प्रश्न कबर खोदणाऱ्यांनी उपस्थित केले आहेत का? असे सवाल संजय राऊत यांनी विचारले आहेत.
संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात
वाराणसी म्हणजे काशीत औरंगजेबाने मंदिरं तोडली. आता अमृत कालात वाराणासीत कॉरिडोअर बनवण्यासाठी शेकोड मंदिरं आणि पुरातन मूर्तींवर बुलडोझर फिरवले गेले. त्या उद्ध्वस्त मूर्तींचं पुढे काय झालं? मोदी यांच्या काळात हे मूर्तिभंजन घडले. औरंगजेब क्रूर होता, पण नंतरचे ब्रिटिश शासनकर्तेही क्रूरच होते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारांना क्रूरपणे, निर्दयीपणे मारलं. जालियनवाला बागेत लोकांवर गोळीबार करणारा जनरल डायर हा ब्रिटिश शासक होता. आज आपले ब्रिटिशांशी उत्तम संबंध आहेत. मोगलांच्या खुणा आपण नष्ट करत आहोत, पण ब्रिटिशांच्या खुणा जतन करुन ठेवल्या आहेत. औरंगजेबाने बाप, भाऊ यांना तुरुंगात डांबंलं किंवा खतम केलं. लालकृष्ण आडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना कैद झालेल्या शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहात नाही.
औरंगजेब महाराष्ट्रातल्या मूर्खांनी जिवंत केला-संजय राऊत
मराठेशाहीच्या समूळ उच्चाटनाची प्रतिज्ञा करुन मोठ्या जय्यत तयारीत औरंगजेब दक्षिणेत आला आणि औरंगाबाद या ठिकाणी तळ ठोकून बसला. औरंगाबादचं मूळ नाव खिर्की. १६०४ मध्ये गुलाम म्हणून आलेल्या मलिक अंबरने ते वसवलं. मलिक अंबरच्या मुलाने त्याचं नाव फतेहपूर केलं होतं, तर औरंगजेबाने ते औरंगाबाद केलं. औरंगजेब मेला तेव्हा सम्राट अशोकापेक्षाही जास्त राज्याचा मालक होता. मात्र त्याचा हा डोलारा मराठ्यांनी पोकळ ठरवला. जेता होण्यासाठी आलेला औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत मिसळून गेला. थडग्यातला औरंगजेब महाराष्ट्रातल्या मूर्खांनी जिवंत केला. तो आता त्यांच्याच मानगुटीवर बसला. अशीही टीका संजय राऊत यांनी केली आहे.